राजस्थानला खाटूशामच्या दर्शनाला जाणे पडले 63.99 लाखात

– घरफोडीचा थरार उघड! दोन सराईत चोर जेरबंद
– तब्बल ₹63.99 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

The Exposer
नागपूर : राजस्थान येथील खाटूशाम मंदिराचे दर्शन घेण्याकरिता गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला मारून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन सराईत घरफोड्यांना पाचपावली पोलिसांनी अटक करत तब्बल ₹63,99,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि कसून चौकशीच्या आधारे पोलिसांनी ही उल्लेखनीय कारवाई केली.

यश उर्फ बबा संजय वासनिक (वय 25), रा. जरीपटका, नागपूर, अंशुल उर्फ अनुप देवाजी वाकडे (वय 20), रा. लष्करीबाग, नागपूर अशी आरोपींची नावे आहेत. अमित हिरालाल गुप्ता (49) रा. स्वर्णनगर, कपिलनगर असे फिर्यादीचे नाव आहॆ. त्यांच्याकडे किराना दुकानाचा व्यवसाय आहॆ. प्राप्त महितीनुसार, गुप्ता हे कुटुंबासह 15 जून 2026 रोजी राजस्थानातील खाटूशामच्या दर्शनासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी त्यांना शेजाऱ्यांनी फोन करून घराचे कुलूप तुटले असल्याची माहिती दिली. कपाटाचे लॉकर तोडून सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल आदी मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

59.12 लाखांचा ऐवज हस्तगत; जुन्या गुन्ह्याचीही उकल

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ₹59.12 लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत आरोपींनी यापूर्वी पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत चोरीची कबुली दिली. त्यामधील 34.780 ग्रॅम वजनाची सुमारे ₹4.86 लाखांची सोन्याची साखळी देखील जप्त करण्यात आली. अशा प्रकारे दोन्ही गुन्ह्यांतील मिळून ₹63,99,420 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त

आरोपींकडून विविध प्रकारचे सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, अंगठ्या, बांगड्या, झुमके, कानातील दागिने, पैंजण, कडे, तसेच रोख रक्कम, ॲपल लॅपटॉप, पोको मोबाईल आदी वस्तू जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचन्द्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त विनिता शाहू, पोलिस उपायुक्त राहुल मदने, एसीपी (लकडगंज) शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विवेक पडघान, तपास पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक रंजीत माजगावकर, पोलीस हवालदार दिलीप पवार, प्रकाश पखान, वासुदेव जयपूरकर, अंकुश राठोड, पोलिस अंमलदार आशिष बावनकर, अतुल फरताडे, पद्माकार उके, महेंद्र शेलोकर, महिलां पोलीस हवालदार हर्षला गजभिये, महिला पोलिस अंमलदार प्रीती थोरात यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More