– ‘तूकाराम’मधून प्रामाणिक प्रशासनाचा चेहरा; शफी पठाण यांच्या लेखणीतून प्रेरणादायी जीवन येणार समोर
The Exposer
नागपूर : प्रशासनातील प्रामाणिकपणा, निडर निर्णयक्षमता आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे वरिष्ठ सनदी अधिकारी (IAS) तुकाराम मुंडे यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘तूकाराम’ हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. या पुस्तकाचे लेखक नागपुरातील वरिष्ठ पत्रकार शफी पठाण असून, न्यू एरा पब्लिशिंग हाऊसतर्फे पुण्यात 17 जुलै रोजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत आहे.

तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रातील अत्यंत स्पष्टवक्ते, कर्तव्यदक्ष आणि निर्भीड प्रशासक म्हणून ओळखले जातात. जिथे जिथे त्यांनी जबाबदारी स्वीकारली, तिथे भ्रष्टाचार, शिस्तभंग आणि अनियमिततेविरुद्ध कठोर भूमिका घेत त्यांनी प्रशासनाला नवी दिशा दिली. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात त्यांनी विश्वासाचे स्थान निर्माण केले, तर अनेक शक्तिशाली स्वार्थी गटांना त्यांच्या निर्णयांचा सामना करावा लागला.
अशा व्यक्तिमत्त्वाचा संघर्षमय, प्रेरणादायी आणि वास्तववादी प्रवास लेखक शफी पठाण यांनी शब्दबद्ध केला आहे. पुस्तकात तुकाराम मुंडे यांच्या बालपणापासून ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंतच्या प्रवासातील अनेक अनुभव, संघर्ष, निर्णय आणि जनहितासाठी लढलेल्या लढ्याचे दस्तऐवजीकरण करण्यात आल्याचे सांगितले जाते.
लेखक शफी पठाण यांनी केवळ चरित्र लिहिले नसून, प्रामाणिक प्रशासनाची गरज, मूल्याधिष्ठित नेतृत्व आणि व्यवस्थेतील आव्हानांवरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ एका अधिकाऱ्याचे चरित्र न राहता, सुजाण नागरिक, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी आणि समाजजीवन समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरण्याची अपेक्षा आहे.
लोकहितासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी दस्तऐवज

पुस्तकाची मूळ किंमत ₹250 असून, प्री-बुकिंग ऑफरमध्ये ₹200 (पोस्टल शुल्क ₹40 अतिरिक्त) इतक्या सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आले आहे. प्रकाशकांच्या माहितीनुसार, पुस्तकासाठी वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘तूकाराम’ हे पुस्तक एका अधिकाऱ्याच्या यशोगाथेपुरते मर्यादित नसून, तत्त्वनिष्ठा, निःस्वार्थ सेवा आणि लोकहितासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी दस्तऐवज म्हणून मराठी वाचकांसाठी महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











