शताब्दी चौकात साकारणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य म्युरल आर्ट पुतळा

– आमदार अभिजित वंजारी यांची मोठी घोषणा, आमदार फंडातून देणार निधी
– मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुराव्याचीही ग्वाही

The Exposer
नागपूर : दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील छत्रपती चौक ते मानेवाडा चौक मार्गावरील ‘परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौक’ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य, आकर्षक आणि कायमस्वरूपी म्युरल आर्ट पुतळा उभारण्यात यावा तसेच चौकाचे सर्वांगीण सुशोभीकरण करण्यात यावे, या मागणीला अखेर आमदार अभिजित वंजारी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

सामाजिक कार्यकर्ते पंकज थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांची भेट घेऊन नागरिकांच्या स्वाक्षरीचे सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, सदर चौक हा फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीचा सामाजिक, शैक्षणिक आणि संविधानवादी चळवळींचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असून येथे संविधान दिन, जयंती, विविध सामाजिक उपक्रम आणि जनआंदोलने नियमितपणे आयोजित केली जातात.

नागपूर महानगरपालिकेने या चौकाला ‘परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौक’ असे अधिकृत नाव दिले असले तरी आजही येथे केवळ तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी अँगलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक चौकात भव्य म्युरल आर्ट पुतळा उभारून आकर्षक प्रकाशयोजना, हरितीकरण आणि आधुनिक नागरी सुविधांसह चौकाचा विकास करण्याची मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळाच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत आमदार अभिजित वंजारी यांनी या प्रकल्पासाठी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच हा प्रस्ताव तयार करून लवकर मंजूर व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे स्वतः पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी आमदार वंजारी यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि संविधानिक मूल्यांना साजेसा हा स्मारक प्रकल्प नागपूरच्या वैचारिक ओळखीला अधिक बळकटी देईल, असा विश्वास व्यक्त करत या जनहिताच्या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पंकज थोरात, पत्रकार संतोष तायडे, सोनू मंडपे, दिलीप बेलीयां यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More