– न्यायालयात सुनावणीपूर्वीच जीवे मारण्याची दिली होती धमकी; अन् दोन दिवसानंतर धारदार शस्त्राने वार करून केली हत्या
The Exposer
नागपूर : वैवाहिक वाद, दारूच्या व्यसनातून सुरू झालेला छळ आणि न्यायालयात सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान एका पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी घडली. हल्ल्यानंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरखेडा येथील भारती रमेश नागपुरे (वय ३८) यांनी जुनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, धाकटी बहीण मंजू संदीप पचारे (वय २७) हिचा विवाह २०२३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील पाचखेड येथील संदीप रामुजी पचारे (वय २९) याच्याशी झाला होता.
लग्नानंतर काही काळातच आरोपी पतीला दारूचे व्यसन लागले. त्यानंतर तो मंजूचा मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. सततच्या अत्याचाराला कंटाळून मंजू सुमारे दीड वर्षांपूर्वी पतीचे घर सोडून कामठी येथे वडिलांकडे राहण्यासाठी आली होती. दोघांमध्ये घटस्फोटाचा दावा अमरावती न्यायालयात सुरू असल्याने ती पुन्हा सासरी जाण्यास तयार नव्हती. मात्र आरोपी वारंवार तिच्यावर सोबत राहण्यासाठी दबाव टाकत होता.
तक्रारीनुसार, २४ जून रोजी वरुड (अमरावती) न्यायालयात दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली होती. लग्नात मिळालेल्या वस्तू परत घेऊन घटस्फोट देण्यास आरोपीने तोंडी तयारी दर्शविली होती. मात्र सोन्याची अंगठी परत करण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि त्याचवेळी आरोपीने मंजूला “जीवे मारण्याची धमकी दिली होती.
२६ जून रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ ते ६.३० वाजताच्या दरम्यान, आरोपी जुनी कामठीतील दरोगा मशिदीजवळील एका गल्लीत मंजूला भेटण्यासाठी आला. जुन्या वादातून आणि घटस्फोटाच्या रागातून त्याने धारदार शस्त्राने मंजूवर सपासप वार केले. तिच्या छाती, गळा, मान, पाठ तसेच हात-पायांवर गंभीर वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. परिसरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. या भीषण हल्ल्यात मंजूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
मृत महिलेची बहीण फिर्यादी भारती नागपुरे यांच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिसांनी आरोपी संदीप पचारे याच्याविरुद्ध हत्याचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून घटनेच्या सर्व पैलूंचा सखोल तपास करण्यात येत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











