अवैध BPCL पेट्रोल पंप प्रकरण तापले! जिल्हाधिकाऱ्यांनंतर आता शहर पोलिस आयुक्तांकडूनही गंभीर दखल

– यशोधरानगर पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश
– परवानग्या, जागा वाटप आणि मंजुरी प्रक्रियेतील कथित अनियमिततेची चौकशी वेगात

The Exposer
नागपूर : उत्तर नागपूरातील वांजरी ले-आऊट परिसरातील कथित अवैध BPCL पेट्रोल पंप प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून, आता या प्रकरणाची शहर पोलिस आयुक्तांनीही दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता शहर पोलिस आयुक्त कार्यालयाकडून यशोधरानगर पोलिस ठाण्याला संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याने संबंधित यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

माहितीच्या अधिकारातून समोर आलेली कागदपत्रे, तक्रारीतील आरोप आणि प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या आधारे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागाने BPCL च्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाला संबंधित पेट्रोल पंपाच्या सर्व कायदेशीर परवानग्या, नगररचना विभागाची मंजुरी, महावितरण, बांधकाम विभाग तसेच अग्निशमन विभागाच्या नियमांचे पालन झाले आहे की नाही, याची प्रत्यक्ष पडताळणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, तक्रारीनुसार हे प्रकरण केवळ परवानग्यांपुरते मर्यादित नसून जागा वाटप आणि पेट्रोल पंप मंजुरी प्रक्रियेतही गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर BPCL ने पेट्रोल पंप मंजूर केल्याचे सांगितले जाते, त्या व्यक्तीच्या नावावर संबंधित जागाच नसल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, नासुप्रने ज्या व्यक्तीला जागा वाटप केल्याचे दाखविले आहे, त्या व्यक्तीच्या नावावर प्रत्यक्ष BPCL पेट्रोल पंप नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे संपूर्ण मंजुरी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने मौजा वांजरा येथील जागेची मागणीच केली नव्हती. त्यांनी वंजारी चौक ते तुकडोजी चौकदरम्यान नासुप्रच्या जागेवर पेट्रोल पंपासाठी अर्ज केला होता. मात्र, त्या मार्गावर नासुप्रची उपलब्ध जागाच नसल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांना मौजा वांजरा येथील जागा नेमकी कशी आणि कोणाच्या पुढाकाराने वाटप करण्यात आली, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नासुप्रच्या काही अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत विशेष रुची दाखविल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला असून, त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, माहितीच्या अधिकारातील अर्जातील काही मुद्दे तक्रार निवारण शाखेकडे वर्ग करण्यात आले असून, त्यावर नियमानुसार कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता शहर पोलिस आयुक्तांनीही या प्रकरणाची दखल घेत यशोधरानगर पोलिसांना चौकशीचे आदेश दिल्याने या प्रकरणातील सत्य काय आहे, नियमभंग झाला आहे का, मंजुरी व जागा वाटप प्रक्रियेत कोणाची भूमिका होती, तसेच संबंधितांवर काय कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, तक्रारदारांनी जागृत नागरिक म्हणून अग्निशमन नियमांना धाब्यावर बसवून ज्वलंशील पदार्थाचा साठा करणाऱ्याची माहिती पोलिस आयुक्ताल्याला दिली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून नियमभंग सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी, जबाबदार संस्था आणि संबंधित व्यक्तींवर कठोर विभागीय तसेच फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यशोधरानगर पोलिस ठाण्यातील तपास अधिकारी अशोक तायडे यांच्या तपासाकडे आणि पोलिस आयुक्त कार्यालयाला सादर करण्यात येणाऱ्या चौकशी अहवालकडे सर्वांचे लक्ष लागले आहॆ.

(टीप : वरील वृत्त उपलब्ध शासकीय पत्रव्यवहार, माहितीच्या अधिकारातून प्राप्त कागदपत्रे, तक्रारीतील आरोप आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशी आदेशांवर आधारित आहे. संबंधित BPCL, नासुप्र किंवा इतर संबंधित पक्षांची अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More