RSS समर्थक वक्तव्यामुळे चर्चेत आलेले विश्वास नांगरे पाटील आता नागपूरच्या कायदा-सुव्यवस्थेच्या रणांगणात

– उद्या स्वीकारणार पोलिस आयुक्तपदाचा पदभार; गुन्हेगारी, अमली पदार्थ, संघटित टोळ्या, वाहतूक आणि नागरिकांच्या अपेक्षांची मोठी कसोटी

The Exposer
नागपूर : राज्याचे वरिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे नागपूरचे नवे पोलिस आयुक्त म्हणून उद्या सकाळच्या सुमारास अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत. रविवारी सायंकाळनंतर ते नागपुरात दाखल झाले. यावेळी सह पोलिस आयुक्त नवीनचन्द्र रेड्डी व अपर पोलिस आयुक्त विनिता शाहू यांनी त्यांचे स्वागत केले.

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे आपल्या कडक प्रशासनशैली, धाडसी निर्णय आणि प्रभावी नेतृत्वामुळे ओळखले जातात. त्यामुळे नागपूर शहर पोलिस आयुक्त म्हणून संपूर्ण विदर्भाचे त्यांच्याकडे लक्ष लागले आहे.

अलीकडील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) संदर्भातील त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले होते. त्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील शहरांपैकी एक असलेल्या नागपुरात त्यांची नियुक्ती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. कायदा-सुव्यवस्था राखताना निष्पक्षता, संवेदनशीलता आणि प्रशासनिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

नागपूरसमोरची मोठी आव्हाने

नागपूर शहरात वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, संघटित गुन्हेगारी, सायबर फसवणूक, वाहतूक कोंडी, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या ही नवे पोलिस आयुक्त म्हणून त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील.

याशिवाय शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांदरम्यान वाहतूक व्यवस्थापन, संवेदनशील भागांतील शांतता कायम राखणे, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोलिसिंग अधिक सक्षम करणे, या बाबींवरही त्यांची विशेष परीक्षा असेल.

विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यशैलीकडून नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. नागपूरसारख्या संवेदनशील आणि वेगाने विकसित होत असलेल्या शहरात कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणे, हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More