– गिट्टीखदान हद्दीतील फुटाळा परिसरात घडली घटना
The Exposer
नागपूर : नागपूर शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच शहरात हत्येची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा तलाव परिसरात सायंकाळच्या सुमारास एका युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, शेखुचा भाचा अस्तक खान याच्यावर लाला पांडे या संशयिताने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अस्तक खानचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून, घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विविध विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे फुटाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, शहराचे नवीन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासमोर कायदा व सुव्यवस्थेचे पहिले मोठे आव्हान उभे राहिले असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे.
टीप: ही बातमी सध्या उपलब्ध प्राथमिक माहितीवर आधारित आहे. पोलिसांच्या अधिकृत निवेदनानंतर तपशीलात बदल होऊ शकतो.
Author: संतोष तायडे
संपादक











