फुटाळा तलाव परिसरात रक्तरंजित थरार! कुख्यात शेखूच्या पुतण्याची धारदार शस्त्रांनी हत्या

– शहरात पुन्हा गँगवॉरची दहशत, सात ते आठ हल्लेखोरांचा जीवघेणा हल्ला; तिघे ताब्यात, मुख्य आरोपींसह अन्य फरार
– पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पदभारानंतर पहिल्याच दिवशी मोठे कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान

The Exposer
नागपूर : गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा तलाव परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या थरारक हल्ल्यात एका युवकाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नागपुरात पुन्हा एकदा गँगवॉरच्या चर्चांना उधाण आले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत युवकाची ओळख अमन शेख अशी झाली असून, तो कुख्यात गुन्हेगार शेखू याचा पुतण्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून योगेंद्र उर्फ लाला पांडे आणि जंगली पांडे यांची नावे समोर आली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास अमन शेख हा फुटाळा तलावाजवळील मयूर जाधव यांच्या दुकानाजवळ आला. तेथे उपस्थित असलेल्या लाला पांडेसोबत त्याचा वाद झाला. वादादरम्यान अमनने लाला पांडे याला थप्पड मारल्याचे सांगितले जाते. त्यानंतर लाला पांडे तेथून निघून गेला.

काही मिनिटांतच लाला पांडे, त्याचा भाऊ जंगली पांडे आणि अन्य सहा साथीदारांसह पुन्हा घटनास्थळी आला. त्यांनी अमन शेखला घेरून चाकू व तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. जीव वाचवण्यासाठी अमनने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर सपासप वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, घटना घडत असताना परिसरात पोलिसांचे गस्ती पथक किंवा बीट मार्शल उपस्थित नसल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गिट्टीखदान पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मुख्य आरोपींसह इतर फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, या हत्येनंतर गिट्टीखदान परिसरात पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे नागपूर पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More