– आशीनगर झोनच्या अधिकाऱ्यांवर संरक्षणाचा आरोप!
– अवैध बांधकामावर कारवाईऐवजी अभय? मनपा आयुक्ताकडे कठोर कारवाईची मागणी
The Exposer
नागपूर : ऑटोमोटिव्ह चौक, मौजा वांजरी येथील कथित BPCL पेट्रोल पंपावर सक्षम प्राधिकरणाची प्रकल्प बांधकाम मंजुरी व फायर NOC नसतानाही अवेध रित्या बांधकाम करून संचालन सुरू ठेवण्यात आले, असा गंभीर आरोप करत नागरी हक्क संरक्षण मंचाचे केंद्रीय अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी महापालिका आयुक्तांकडे आशीनगर झोनच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित पेट्रोल पंप चालकाने ग्राउंड प्लस एक मजली इमारतीचे बांधकाम आवश्यक मंजुरीशिवाय उभारले असून, अग्निसुरक्षा उपाययोजनाही पूर्ण केल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात अग्निशमन विभागाने कारवाईचे निर्देश दिल्याचे तसेच नगररचना विभागानेही बांधकाम मंजुरीअभावी कारवाईचे संकेत दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, आशीनगर झोनमधील संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत कारवाई न करता उलट संबंधित पेट्रोल पंपाला संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मनपाच्या नियमांचे उघड उल्लंघन होत असतानाही जबाबदार अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, विभागीय अधिकाऱ्यांनी नगररचना विभागाची मंजुरी घेण्याचे सांगितले असतानाही प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत त्यांची विभागीय चौकशी करून कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जनार्दन मून यांनी निवेदनाद्वारे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अवैध बांधकामावर तातडीने कारवाई करावी तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या आशीनगर झोनच्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून प्रकरण निकाली काढावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
(टीप : वरील वृत्तातील आरोप हे तक्रार निवेदनात करण्यात आलेल्या दाव्यांवर आधारित आहेत. संबंधित अधिकारी किंवा पेट्रोल पंप व्यवस्थापनाची भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध केली जाईल.)
Author: संतोष तायडे
संपादक











