मेयोतील ‘लाचखोर HOD’वर ACB चा दणका!

– ₹30 हजारांच्या लाचेची मागणी; मेयो रुग्णालयातील
– विभागप्रमुखासह लघुलेखकावर गुन्हा, प्रक्रियेला वेग

The Exposer
नागपूर : भ्रष्टाचाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत मेयो रुग्णालयातील वैद्यकीय मंडळाचे अध्यक्ष तथा शल्यचिकित्सा विभागप्रमुख (HOD) डॉ. नंदकिशोर कलमनारायण जैस्वाल आणि लघुलेखक आशीष मेटेकर यांच्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सरकारी वैद्यकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असून वैद्यकीय रजेवर होते. तीन महिन्यांच्या वैद्यकीय रजेचा कालावधी मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय मंडळाची शिफारस व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे पाठविण्यात आले होते.

यावेळी वैद्यकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. जैस्वाल आणि लघुलेखक आशीष मेटेकर यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी ₹30 हजारांची लाच मागितल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली. ACB ने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेच्या मागणीची खातरजमा झाली. त्यानंतर आरोपींनी तडजोडीअंती ₹20 हजार स्वीकारण्याची तयारी दर्शविली. मात्र संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली नाही.

तथापि, पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने डॉ. नंदकिशोर कलमनारायण जैस्वाल व आशीष मेटेकर यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ACB नागपूरच्या पथकाने केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More