मेयो लाचकांडात मोठी घडामोड! आरोपी डॉक्टर व लिपिक दोन दिवस एसीबी कोठडीत

– आता ‘काळ्या कमाई’चा हिशेब उघडणार?, अनेक रडारवर 

The Exposer
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथील वैद्यकीय मंडळाच्या (Medical Board) प्रमाणपत्रासाठी लाच मागितल्याच्या गाजलेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेले शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. नंदकिशोर कमलनारायण जायसवाल आणि कनिष्ठ लिपिक आशीष मेटेकर यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी (पीसीआर) सुनावली आहे.

जिल्हा न्यायाधीश श्री. ग्वालानी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा आदेश दिला. सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडत तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याचे सांगितले. आरोपींचे व्हॉइस सॅम्पल घेणे, त्यांच्या निवासस्थानांची झडती, महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी तसेच कथित भ्रष्टाचारातून मिळालेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. आरोपींच्या वतीने ॲड. मिलिंद तोतरे यांनी बाजू मांडली.

एसीबीचा तपास आता ‘काळ्या कमाई’वर केंद्रित

पोलिस कोठडीदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) डॉ. जायसवाल यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करणार आहे. तपासात पुढील बाबींची पडताळणी केली जाणार आहे. आरोपी व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर किती चल-अचल मालमत्ता आहे. किती बँक खाती आणि आर्थिक व्यवहार आहेत. किती बँक लॉकर असून त्यामध्ये काय ठेवण्यात आले आहे. कथित लाचेच्या पैशांची कुठे गुंतवणूक करण्यात आली.

आर्थिक गुंतवणूक, कागदपत्रे आणि व्यवहारांचा संपूर्ण तपशील

सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत एसीबी महत्त्वाचे दस्तऐवज आणि डिजिटल पुरावे गोळा करण्यावर भर देणार असून आरोपी डॉक्टरची कसून चौकशीही केली जाणार आहे. पोलिस कोठडीदरम्यान दोन्ही आरोपींना पोलिस लॉकअपमध्ये ठेवण्यात येणार आहे.

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार हे वर्धा आरटीओ कार्यालयात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय रजेनंतर पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी त्यांना मेयोच्या मेडिकल बोर्डाकडून फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आली आणि नंतर ती रक्कम २० हजार रुपयांवर ठरल्याचा आरोप आहे.

तक्रार मिळाल्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता लाच मागितल्याची बाब समोर आली. सापळा कारवाईदरम्यान आरोपींना तक्रारदाराबाबत संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नाही. मात्र, लाच मागितल्याचे पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर एसीबीने दोघांना अटक करून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. आरोपी डॉक्टर आणि लिपिक यांनी कथित भ्रष्टाचारातून किती संपत्ती जमवली, ती कुठे गुंतवली आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यावर असणार आहे. त्यामुळे या तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More