– गणेशपेठ पोलिस ठाण्यातील हवालदार ३ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
– चार्जशीटची प्रत देण्यासाठी ५ हजारांची मागणी; पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ अटक
The Exposer
नागपूर : भ्रष्टाचारविरोधी विभागाने (एसीबी) नागपुरात बुधवारी धडक कारवाई करत गणेशपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. आरोपी हवालदाराचे नाव आशीष निकोडे असून, या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे स्वतः पोलिस विभागातील कर्मचारी आहेत. ड्युटीवर असताना त्यांचा अपघात झाला होता. या अपघाताची नोंद गणेशपेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास हवालदार आशीष निकोडे यांच्याकडे होता.
अपघात भरपाई मिळविण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यासाठी त्यांना या प्रकरणातील आरोपपत्र (चार्जशीट) प्रतीची आवश्यकता होती. मात्र, चार्जशीटची प्रत देण्यासाठी आरोपी हवालदाराने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. १ जुलै २०२६ रोजी गणेशपेठ पोलिस ठाण्यात आरोपी हवालदार आशीष निकोडे याला लाचेच्या पहिल्या हप्त्यापोटी ३ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस उपअधीक्षक महेश भोरटकर, पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे यांच्यासह एसीबीच्या पथकाने सहभाग घेतला.
आरोपी हवालदाराविरुद्ध गणेशपेठ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











