इशाऱ्याकडे दुर्लक्ष जीवावर बेतले! मकरधोकडा तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन मित्रांचा बुडून दुर्दैवी अंत

– एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू

The Exposer
नागपूर : जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात बुधवारी दुपारी हृदयद्रावक दुर्घटना घडली. पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या नागपूरातील दोन तरुण मित्रांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यापैकी एका तरुणाचा मृतदेह शोध पथकाला सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध गुरुवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या प्रकरणी उमरेड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिघोरी येथील वैभवनगर परिसरातील प्रवीण मारुती नरवाडे (वय १८) आणि त्याचा मित्र प्रणय विनोद रंदीवे (वय १९) हे बुधवारी दुचाकीने मकरधोकडा तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर दोघांनी तलावात पोहण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला.

तलावाजवळ उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी तलावातील पाणी खोल असल्याने आणि जीवितास धोका असल्याने त्यांना वारंवार पोहण्यासाठी उतरू नका, असा इशारा दिला होता. मात्र, त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून दोघांनी सुरक्षेसाठी उभारलेले तारांचे कुंपण ओलांडून तलावात प्रवेश केला. काही अंतरावर गेल्यानंतर दोघेही खोल पाण्यात अडकून बुडाल्याचे सांगितले जाते.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य सुरू केले व पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीमेदरम्यान प्रवीण नरवाडे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र, अंधार पडल्याने दुसऱ्या तरुणाचा शोध थांबविण्यात आला.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनील मस्के यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार असून बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक पोलिसांनी या दुर्दैवी घटनेची माहिती दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना दिली असून परिसरात शोककळा पसरली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More