The Exposer
नागपूर : नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तसेच टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भगवंत गोल्हर यांचे गुरुवारी पहाटे दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि निर्भीड पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोल्हर यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मूळचे माणिकवाडा (धनज), ता. नेरपरसोपंत, जि. यवतमाळ येथील असलेल्या श्री. गोल्हर यांनी अनेक दशकांपर्यंत पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. आपल्या निर्भीड लेखणी, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेतील मूल्यनिष्ठ भूमिकेमुळे त्यांनी पत्रकार विश्वात मानाचे स्थान निर्माण केले होते.
नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकार भवनाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि मार्गदर्शक भूमिकेमुळे अनेक तरुण पत्रकारांना प्रेरणा मिळाली.
त्यांच्या पार्थिवावर आज (गुरुवार, दि. २ जुलै) सायंकाळी ४.३० वाजता अंबाझरी घाट, नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी कोकीळा गोल्हर, पुत्र डॉ. संदीप गोल्हर व राहुल गोल्हर, तसेच नातवंडे, नातेवाईक, मित्रपरिवार आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
तुळशीदास गोल्हर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक ज्येष्ठ, अनुभवी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. विविध पत्रकार संघटना, सामाजिक संस्था आणि मान्यवरांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











