– आधी कच्ची बिले, नंतर तयार करायचा पक्की बिले; जीएसटीची रक्कम मात्र सरकारी खात्यातच भरली नाही
– हुडकेश्वर पोलिसांकडून गुन्हा दाखल; आणखी व्यापारी फसले का, याचाही तपास
The Exposer
नागपूर : जीएसटी भरण्याच्या नावाखाली एका इलेक्ट्रिकल साहित्य व्यावसायिकाची तब्बल ८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, व्यापाऱ्याचा अनेक वर्षांचा विश्वास संपादन केलेल्या अकाउंटंटनेच जीएसटीसाठी घेतलेली रक्कम सरकारी खात्यात जमा न करता स्वतःकडेच ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहॆ.
पोलिसांच्या माहितीनुसार, गजानन नगर येथील पांडुरंग जगनराव राऊत (वय ४०) यांचा चक्रपाणी नगर येथे ‘लक्ष्मी ट्रेडिंग सर्व्हिसेस’ या नावाने इलेक्ट्रिकल साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय आहे. वर्ष २०२३ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रकाश शर्मा हा त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये अकाउंटंट म्हणून कार्यरत होता. तो कच्च्या बिलांच्या आधारे पक्की बिले तयार करत होता तसेच जीएसटीसह सर्व करसंबंधित व्यवहार त्याच्याकडे सोपविण्यात आले होते.
व्यापाऱ्याने वेळोवेळी जीएसटी भरण्यासाठी आरोपीच्या मोबाईलवर पैसे पाठविले. मात्र, आरोपीने विश्वासाचा गैरफायदा घेत सुमारे ८ लाख रुपये स्वतःकडेच ठेवले आणि जीएसटीची रक्कम सरकारच्या खात्यात भरलीच नाही. बराच काळ हा प्रकार लक्षात आला नाही. खात्यांची पडताळणी केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.
यानंतर व्यापाऱ्याने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
आधी कच्ची, नंतर पक्की बिले, जिएसटीवर प्रश्नचिन्ह
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यापाऱ्याकडील कच्च्या बिलांच्या आधारे पक्की जीएसटी बिले तयार करत होता. त्यामुळे व्यापाऱ्याचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता. यात तो तरबेज होता. जिएसटीच्या नियमानुसार केवळ पक्के बिले आणि ती सुध्दा ऑनलाईन रेकॉर्डवर ठेवली जातात. असे असतांना येथे मात्र आधी कच्चे बिल तयार केले जायचे. याचाच गैर फायदा घेत आरोपीने जीएसटीची रक्कम स्वतःकडे ठेवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप असून, संपूर्ण व्यवहाराची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











