– बनावट कागदपत्रांच्या जोरावर ट्रकचे दुहेरी नोंदणी रॅकेट?; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
– अरुणाचल प्रदेश ते महाराष्ट्रात खेळ; शासनाची फसवणूक, आरटीओच्या तक्रारीनंतर कारवाई
The Exposer
नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रकची दुहेरी नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक होमेश चंद्रकांत काळे यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे मोहम्मद हुसेन मोहम्मद इस्माईल, दिनेशकुमार ओमप्रकाश आणि मोहम्मद एजाज अब्दुल रहमान अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार होमेश चंद्रकांत काळे हे आरटीओमध्ये मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करताना २०२२ मध्ये चार ट्रक अरुणाचल प्रदेशातून महाराष्ट्रात आणून त्यांची नव्याने नोंदणी करण्यात आल्याचे आढळून आले. मात्र, या नोंदणीसाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे प्राथमिक तपासात बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान, संबंधित ट्रकची प्रथम मध्य प्रदेशातील देवास येथील कागदपत्रांच्या आधारे अरुणाचल प्रदेशात पुनर्नोंदणी करण्यात आली. त्यानंतर त्याच वाहनांची नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात सादर करून महाराष्ट्रातील नवीन नोंदणी क्रमांक मिळविण्यात आल्याचे समोर आले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेद्वारे शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीर लाभ मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर कपिलनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या बनावट नोंदणी प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच याच पद्धतीने इतर वाहनांचीही दुहेरी नोंदणी करण्यात आली आहे का, देशभरात एकाच नंबर प्लेटवर अनेक वाहने धावत आहेत का,? याचाही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











