उपराजधानी रक्तरंजित! काही तासांत दोन हत्यांनी नागपूर हादरले

– भांडेवाडीत गुंडाचा खात्मा, नवीन कामठीत विवाहितेची निर्घृण हत्या
– दोन्ही प्रकरणांत पोलिसांची विशेष पथके आरोपींच्या मागावर

The Exposer
नागपूर : उपराजधानी नागपुरात अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन खळबळजनक हत्यांच्या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका प्रकरणात भांडेवाडी परिसरात कारागृहातून नुकताच सुटलेल्या एका गुंडाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या प्रकरणात नव्या कामठी परिसरात एका विवाहित महिलेची हत्या करून तिचा मृतदेह गाडा शिरपूर रोडलगत फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या दोन्ही घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भांडेवाडी वाठोडा आणि नवीन कामठी पोलिसांनी हत्येचे गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

कारागृहातून येताच गुंडाचा निर्घृण खात्मा

पूर्वीच्या वाठोडा व सध्या नव्याने भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर, भांडेवाडी परिसरात गणेश प्रितमलाल बोरकर या युवकाची अज्ञातांनी धारदार शस्त्राने हत्या केली. स्थानिक स्तरावर गणेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची चर्चा असून त्याच्याविरुद्ध अत्याचारासह विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तो काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. यापूर्वी तो अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असल्याचेही सांगितले जाते. तो एकटाच राहत होता, तर त्याच्या दोन पत्नी आणि तीन मुले वेगळी राहत असल्याची माहिती आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जुने वैमनस्य, गुन्हेगारी वाद किंवा इतर कोणत्या कारणातून ही हत्या झाली का, याचा तपास पोलीस करत आहेत.

नवीन कामठीत महिलेची हत्या, लिव्ह इन पार्टनर ताब्यात

दुसरी घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडा शिरपूर रोड परिसरात उघडकीस आली. रस्त्याच्या कडेला एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राचे अनेक वार आढळून आले आहेत.याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मृतक महिलेच्या लिव्ह इन पार्टनरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहॆ.

मृत महिलेची ओळख भाग्यश्री (वय ४२, रा. गाडा, कामठी) अशी झाली आहे. ती दोन मुलांची आई असून नागपूर येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होती. गुरुवारी सायंकाळी गाडा-शिरपूर रोड परिसरात भाग्यश्रीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक जखमा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री काही काळापासून विनोद उर्फ राजेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. विनोद हा नशेच्या आहारी गेलेला असून संशयी स्वभावामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून भाग्यश्री त्याच्यापासून वेगळी झाली होती आणि वाघोली येथे भाड्याच्या खोलीत राहत होती.

या पार्श्वभूमीवर संशयाच्या आधारे नवीन कामठी पोलिसांनी विनोद उर्फ राजेंद्र याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. मात्र, हत्येबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नसून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. तपासानंतरच हत्येचे नेमके कारण आणि आरोपीबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More