– हुडकेश्वरमध्ये भूखंड घोटाळा उघड; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
The Exposer
नागपूर : आधीच विक्री झालेल्या भूखंडाचे बनावट कागदपत्र तयार करून तो स्वतःच्या मालकीचा असल्याचे भासवत एका खरेदीदाराची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार जयंत माणिकराव हरडे (वय ३२, अर्जुनी रोड, ता. लाखांदूर, जि. भंडारा) यांना नागपुरात भूखंड खरेदी करायचा होता. डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२५ या कालावधीत आरोपी सुनील चंद्रकांत दोषी (वय ५२, बेसा, मनिषनगर) याने त्यांना नरसाळा येथील गगनदीप को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील १५०० चौरस फुटांचा प्लॉट क्रमांक ४ दाखवला.
हा प्लॉट आरोपी प्रीती प्रवीण चाचेरे (वय ४७) यांच्या मालकीचा असल्याचा दावा करत ३२ लाख रुपयांत सौदा करण्यात आला. जयंत हरडे यांनी वेळोवेळी रोख रक्कम व धनादेशाद्वारे एकूण ३२ लाख रुपये अदा केले. त्यानंतर विक्री करारनामा आणि पावर ऑफ अटर्नीची कागदपत्रेही तयार करण्यात आली. मात्र, ४ मे २०२३ रोजी प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी करताना त्या ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तीच्या मालकीचा फलक दिसून आल्याने संशय निर्माण झाला.
यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित भूखंड ३० ऑगस्ट १९९० रोजीच नोंदणीकृत विक्रीपत्राद्वारे विकला गेला होता, तसेच त्यानंतर ११ मार्च १९९२ रोजी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित झाल्याचे समोर आले. त्यामुळे आरोपींनी आधीच विकलेल्या भूखंडाची बनावट कागदपत्रांच्या आधारे पुन्हा विक्री केल्याचे स्पष्ट झाले.
फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर तक्रारदाराने पैसे परत मागितले असता आरोपींनी १७ लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित १५ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जयंत हरडे यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमजद शाह कादर शेख करीत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक











