प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट! अत्याचाराला कंटाळलेल्या पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी; दोघे जेरबंद

– चारित्र्यावर संशय, मारहाण आणि मुलीवर वाईट नजरेमुळे टोकाचे पाऊल

The Exposer
नागपूर : प्रेमविवाहानंतर पत्नीवर सातत्याने चारित्र्यावर संशय घेणे, मानसिक व शारीरिक छळ करणे आणि अल्पवयीन मुलीवरही वाईट नजर ठेवणे, या प्रकारांना कंटाळून पत्नीनेच पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

भांडेवाडी परिसरात घडलेल्या या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह दोन आरोपींना अटक केली असून, आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे. गणेश ऊर्फ गुरुदेव प्रितमलाल बोरकर (४५) असे मृताचे नाव आहे. तर मनिषा गणेश बोरकर (३७) आणि अभिजीत पुरुषोत्तम साखरे (२९, रा. कन्हान) यांना अटक करण्यात आली आहे. अमन कैथवास, रोहित बोरकर (कांद्री-कन्हान) आणि एक अल्पवयीन आरोपी फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

चारित्र्यावर संशय, मारहाण आणि सततचा छळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषाचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या पतीच्या छळाला कंटाळून ती दोन मुलींसह माहेरी राहत होती. त्यानंतर तिची गणेश बोरकर याच्याशी ओळख झाली आणि दोघांनी कुटुंबाच्या संमतीने प्रेमविवाह केला. मात्र, काही वर्षांनी गणेशचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा स्वभाव समोर आला. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार मारहाण करू लागला. मानसिक आणि शारीरिक अत्याचार असह्य झाल्याने मनिषा पुन्हा माहेरी निघून गेली.

एक लाखांची सुपारी; ५० हजार आगाऊ

पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी मनिषाने अभिजीत साखरे, अमन कैथवास आणि रोहित बोरकर यांना एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचा तपासात उलगडा झाला. त्यापैकी ५० हजार रुपये आगाऊ देण्यात आले होते, तर उर्वरित रक्कम काम झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. त्यानुसार आरोपींनी भांडेवाडी परिसरात गणेशला गाठून त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरून पसार झाले.

रडत पोलिस ठाण्यात पोहोचली; पण तपासात कट उघड

पतीचा खून झाल्यानंतर मनिषाने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन आक्रोश करत अज्ञात आरोपींनी हत्या केल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे, चौकशी आणि घटनाक्रमाची सखोल पडताळणी केल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला. पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले.

मुलीवर वाईट नजर; गुन्हेगारी पार्श्वभूमीही उघड

तपासादरम्यान गणेश बोरकर याच्यावर पत्नीच्या पहिल्या विवाहातील १६ वर्षीय मुलीवर वाईट नजर असल्याची बाबही समोर आली. तो मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आहे. तसेच पाच वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तो आरोपी होता आणि त्या गुन्ह्यातून डिसेंबर २०२५ मध्ये कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्या विकृत वर्तनामुळे मुलीच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भांडेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन चरडे आणि त्यांच्या पथकाने केला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More