हनी ट्रॅप प्रकरणी डॉ. जयश्वालचा पाय खोलात, मेयोतील लाचकांडात न्यायालयीन कोठडी 

– एसीबीचा आर्थिक व्यवहारांचा तपास वेगात; बँक खाती, लॉकर आणि मालमत्तेची छाननी सुरू

The Exposer
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथील गाजत असलेल्या लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेले शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. नंदकिशोर कमलनारायण जायसवाल आणि त्यांचा स्टेनो यांना न्यायालयाकडून कोणताही तातडीचा दिलासा मिळाला नाही. दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावत नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

जिल्हा न्यायाधीश श्री. ग्वालानी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला. आरोपींकडून जामीन अर्जही दाखल करण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी त्यावरील सुनावणी होऊ न शकल्याने दोघांनाही सध्या कारागृहातच राहावे लागणार आहे.

सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी न्यायालयात तपासाची प्रगती आणि उपलब्ध पुरावे सादर केले. तर आरोपींच्या वतीने ऍड. मिलिंद तोतरे यांनी बाजू मांडली.

वैद्यकीय मंडळाच्या प्रमाणपत्रासाठी लाचेची मागणी

भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र देण्यासाठी कथितरित्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी डॉ. जायसवाल आणि त्यांच्या स्टेनोला अटक केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

बँक खाती, लॉकर मालमत्तेची कसून चौकशी

पोलीस कोठडीदरम्यान एसीबीने आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या बँक खात्यांची, बँक लॉकरची, चल-अचल मालमत्तेची तसेच विविध गुंतवणुकांशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली जात आहे. कथित भ्रष्टाचारातून मिळालेल्या रकमेची गुंतवणूक नेमकी कुठे करण्यात आली, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

या गाजत असलेल्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता एसीबीच्या तपासातून व्यक्त करण्यात येत आहे. तर एका हनी ट्रॅप प्रकरणी डॉ. जयश्वालचा पाय खोलात असल्याची उलट सुलट चर्चा आहॆ. त्यामुळं डॉ. जयश्वाल प्रकरणी एसीबी व पोलिस विभागाकडून होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहॆ. B

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More