भाग्यश्री हत्याकांडाचा ४८ तासांत पर्दाफाश, दुसऱ्या पतीने रक्तरंजित कट रचल्याचे उघड 

– आरोपीस बडनेरा स्थानकावरून करण्यात आली अटक
– घोरपड–शिरपूर मार्गावर धारदार शस्त्राने केली होती हत्या

The Exposer
नागपूर : कामठीजवळील घोरपड–शिरपूर रस्त्यावर घडलेल्या भाग्यश्री विनोद रजक (३५) यांच्या निर्घृण हत्याकांडाचा गुन्हे शाखेच्या युनिट–६ ने अवघ्या ४८ तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणात मृत महिलेचा दुसरा पती राजेंद्र नत्थुजी कोटरुंगे (४५, रा. नांदगाव येसंबा, ता. पारशिवनी) याला अटक करण्यात आली असून, कौटुंबिक वाद आणि सूडाच्या भावनेतून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री यांचा पहिला विवाह २०१० मध्ये जबलपूर येथील विनोद रजक यांच्याशी झाला होता. मात्र, पतीकडून सातत्याने दारूच्या नशेत मारहाण, छळ आणि चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याने त्यांनी ते घर सोडून माहेरी गादा (कामठी) येथे वास्तव्य केले.

यानंतर २०२३ मध्ये त्यांनी राजेंद्र कोटरुंगे याच्याशी मंदिरात दुसरा विवाह केला. मात्र, दुसऱ्या विवाहानंतरही त्यांच्यावर अत्याचार आणि मारहाण सुरूच राहिल्याने त्यांनी राजेंद्रलाही सोडले. त्या बहिण सरिता खुरपडी यांच्याकडे राहत होत्या आणि खाजगी नोकरी करून उदरनिर्वाह करत होत्या.

राजेंद्र हा वारंवार त्यांच्या कामाच्या ठिकाणी तसेच माहेरी जाऊन त्यांना परत घरी येण्यासाठी दबाव टाकत होता. हा वाद गादा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पोलिस पाटील यांच्यापर्यंतही पोहोचला होता. आरोपी वापरत असलेल्या दुचाकीचे मासिक हप्ते भाग्यश्री भरत असल्याने त्यांनी त्याच्याकडून गाडीची चावी काढून घेतली होती. याच कारणावरून आरोपीने भाग्यश्रीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

२ जुलै रोजी सायंकाळी भाग्यश्री नेहमीप्रमाणे घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या बहिणी सरिता यांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी घोरपड–शिरपूर मार्गावर भाग्यश्री रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या. धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

याप्रकरणी नवीन कामठी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट–६ ला आरोपी राजेंद्र बडनेरा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रेल्वे पोलिसांच्या मदतीने बडनेरा रेल्वे स्थानकावरून त्याला ताब्यात घेतले असून नवीन कामठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More