केवळ 12 वी शिक्षण… पण सायबर फसवणुकीत ‘मास्टरमाइंड’! राजस्थानातून 5 गुन्ह्यांतील फरार आरोपीस अटक 

– बेलतरोडीतील ₹3.85 लाखांचे ऑनलाइन फसवणूक प्रकरण; गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 ची धडक कारवाई 

The Exposer
नागपूर : केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला, मात्र सायबर गुन्हेगारीत मास्टरकी मिळवत विविध राज्यांमध्ये ऑनलाइन फसवणुकीचे जाळे उभारणाऱ्या फरार आरोपीला नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट-04 ने राजस्थानातून अटक केली आहे. बेलतरोडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या ₹3.85 लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणासह आणखी चार गुन्ह्यांमध्ये तो वाँटेड असल्याचे तपासात उघड झाले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने केली. प्राप्त माहितीनुसार,

बेलतरोडी पोलिस ठाण्यात अप. क्र. 68/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(D) अन्वये गुन्हा दाखल आहे. फिर्यादी राघुनाथ प्रसाद कुमार गुजर (वय 57, रा. बेसा रोड, नागपूर) यांची 30 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून ₹3 लाख 85 हजारांची फसवणूक करण्यात आली होती.

तपासादरम्यान वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-04 ने राजस्थान राज्यात शोधमोहीम राबवून संदीप महेंद्र दान चारण (वय 29, रा. खुंडिया, पो. ठाणे सरदार शहर, जि. चुरू, राजस्थान) याला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपी हा सायबर पोलिस ठाणे पुणे शहर, चंदगड (कोल्हापूर), भोकरदन (जालना) आणि रतनगड (चुरू, राजस्थान) येथील आणखी चार गुन्ह्यांमध्येही फरार असल्याचे समोर आले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून राजस्थानातील कोटा येथील न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला. त्यानंतर पुढील तपासासाठी आरोपीला बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सायबर गुन्हेगारांचे राज्याबाहेर जाऊनही अचूक लोकेशन शोधून त्यांना अटक करण्याची नागपूर गुन्हे शाखेची ही कारवाई पुन्हा एकदा प्रभावी ठरली असून, आरोपीकडून आणखी फसवणुकीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 च्या पोलिस पथकातील पोलिस उपनिरीक्षक जितेश आरवेली, पोलिस हवालदार गोविंद देशमुख, अजय यादव, सतिश ठाकरे आदींनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More