सीताबर्डी पोलिसांची दमदार कामगिरी! २४ वर्षांपासून चकमा देणारा फरार आरोपी अखेर जेरबंद

– खरी ओळख लपवून राहायचा, आरोपीला कळमेश्वर तालुक्यातून अटक; न्यायालयासमोर केले हजर

The Exposer
नागपूर : तब्बल २४ वर्षांपासून स्वतःची खरी ओळख लपवून पोलिस आणि न्यायालयाच्या नजरेतून सुटत असलेल्या फरार आरोपीला अखेर सीताबर्डी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास, अचूक माहिती आणि प्रभावी पाळतीच्या जोरावर जेरबंद केले. या कारवाईमुळे सीताबर्डी पोलिसांच्या चिकाटी, व्यावसायिक तपासकौशल्य आणि गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणण्याच्या बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजय मनोहर पेटकर (रा. प्लॉट क्र. १०/५, यशोधरानगर, कामठी रोड) असे आहे. त्याच्याविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीने स्वतःची ओळख बदलून आणि वास्तव्य लपवून न्यायालयासमोर हजर राहणे टाळले होते.

दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत तदर्थ जिल्हा न्यायाधीश यांनी आरोपीला कोणत्याही परिस्थितीत न्यायालयासमोर हजर करण्याचे कठोर आदेश दिले होते. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी जुन्या नोंदींची छाननी, गुप्त माहिती संकलन आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू केले.

तपासादरम्यान आरोपी सध्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मसेपठार गावात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपीच्या हालचालींवर बारकाईने पाळत ठेवली.

शनिवारी (४ जुलै) सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला तातडीने तदर्थ जिल्हा न्यायाधीश यांच्यासमोर हजर करण्यात आले.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More