अवैध सावकारीचा पर्दाफाश; एक अटकेत, महिला साथीदार फरार

– ३ लाखांचे कर्ज; १५ लाखांची वसुली, कुख्यात गुंडाकरवी धमकी दिल्याचा आरोप 

The Exposer
नागपूर : सक्करदरा परिसरात खासगी सावकारी आणि मालमत्ता व्यवहाराच्या आडून सुरू असलेल्या कथित आर्थिक शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ ३ लाख रुपयांचे कर्ज घेतलेल्या तरुणाकडून तब्बल १५ लाख रुपये वसूल केल्याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याची महिला साथीदार अद्याप फरार आहे.

याप्रकरणी कुख्यात गुंडाकरवी धमकविल्याचा आरोप आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कमलेश गणपतराव हनोते (४२) असे असून, अनिता पूरनलाल भारद्वाज हिचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहित मिलिंद पारधी (२४) यांनी मार्च २०२५ मध्ये कमलेश हनोते याच्यासोबत ४८ लाख रुपयांच्या भूखंड खरेदीचा व्यवहार केला होता. या व्यवहारासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने सुमारे ३० लाख रुपये दिले. मात्र, भूखंडाची दस्त नोंदणी न न झाली नाही आणि रकम ही परत करण्यात आली नाही.

दरम्यान, पारधी यांना व्यवसायासाठी निधीची गरज निर्माण झाल्याने त्यांनी आपले पैसे परत मागितले. त्यावेळी कमलेश हनोते याने त्यांची ओळख अनिता भारद्वाज हिच्याशी करून दिली. ती दरमहा १० टक्के व्याजाने कर्ज देत असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला पारधी यांनी १ लाख रुपयांचे कर्ज घेऊन ते व्याजासह फेडले. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये त्यांनी पुन्हा ३ लाख रुपये घेतले. याच कर्जामुळे पुढे कथित आर्थिक शोषणाला सुरुवात झाल्याचा आरोप आहे.

दमदाटी, धमक्या आणि पैशांची वसुली

कर्जफेडीला विलंब होताच आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ, धमक्या आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. घरावर गुंड पाठवून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दबावामुळे घाबरलेल्या फिर्यादीने ३ लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात तब्बल १५ लाख रुपये अदा केले. एवढ्यावरही आरोपींची मागणी थांबली नसल्याने अखेर त्यांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कमलेश हनोते याला अटक केली असून अनिता भारद्वाज हिचा शोध सुरू आहे. या प्रकरणात अवैध सावकारीच्या माध्यमातून आर्थिक शोषण करणारे मोठे जाळे कार्यरत आहे का, तसेच इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सक्करदरा पोलिसांकडून सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More