धार्मिक स्थळी तरुणीशी अश्लील वर्तन; आरोपी सीसीटीव्हीत कैद, पोलिसांचा शोध सुरू

– पवित्र स्थळीही महिलांची सुरक्षितता धोक्यात; धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

The Exposer
नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा रोड परिसरातील एका धार्मिक स्थळी दर्शनासाठी गेलेल्या तरुणीशी अश्लील वर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणी धार्मिक स्थळी दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुमारे ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीने संधी साधून तिच्याशी अश्लील वर्तन करत तिच्या अंगाला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला.

या प्रकाराला तरुणीने तात्काळ विरोध करत आरोपीला जाब विचारला. मात्र, त्याने उलट तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, परिसरात उपस्थित नागरिक जमा होऊ लागल्याचे पाहताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

सदर घटना धार्मिक स्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More