– गुन्हे शाखा युनिट-५ची धडाकेबाज कारवाई; गुप्त माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद
The Exposer
नागपूर : बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचा माग काढत नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक-५च्या पथकाने अमरावती जिल्ह्यात धडक कारवाई केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे गंभीर गुन्हा करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.
वाठोडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी प्रवीण रूपराजजी धांदे (वय ५०), रा. बोरगाव धांदे, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती हा फरार होता. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे.
गुन्हे शाखा युनिट-५चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या आदेशानुसार फरार आरोपीचा कसून शोध सुरू होता. दरम्यान, आरोपी अमरावती जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी असल्याची गोपनीय माहिती पोलिस पथकाला मिळाली. या माहितीची खातरजमा करून पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने बोरगाव धांदे येथे धडक दिली आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्याला वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.
ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) दिपक अग्रवाल, आणि सहायक पोलिस आयुक्त शिवप्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार गणेश कदम, शेख नजीर, राजू टाकळकर, विशाल नागभिडे, अमोल भक्ते आदींनी केली.
Author: संतोष तायडे
संपादक











