– हत्या, हल्ले आणि अमली पदार्थांच्या गुन्ह्यात मुलांच्या वापरावर ‘ब्रेक’; पोलिस BNS 95 चा करणार प्रहार!
The Exposer
नागपूर : अल्पवयीन मुलांच्या हातात चाकू, तलवार किंवा अन्य शस्त्रे देऊन, पैशांचे आमिष दाखवून, धमकावून किंवा दिशाभूल करून त्यांचा हत्या, प्राणघातक हल्ले, अमली पदार्थांची तस्करी आणि अन्य गंभीर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या गुंडांनो, आता याद राखा! अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीच्या दलदलीत ढकलणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध आता केवळ समज किंवा इशारा देऊन थांबणार नाही; तर भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम 95 अंतर्गत त्यांच्यावर प्रभावी असा कठोर कायदेशीर कारवाईचा प्रहार शहर पोलिस करणार आहॆ.
गुरुवारी अपर पोलीस आयुक्त विनीता साहू यांनी कपिलनगर पोलीस ठाण्याला भेट देत परिसरातील हिस्ट्रीशीटरांची तपासणी केली. यावेळी त्यांनी सराईत गुन्हेगारांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, कमी वयाच्या मुलांना कोणत्याही प्रकारे दिशाभूल करून अथवा त्यांचा गैरफायदा घेत गुन्हेगारीच्या दलदलीत ढकलण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
साहूंचा हा इशारा केवळ औपचारिक चेतावणी म्हणून न पाहता, अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करणाऱ्या टोळ्या आणि त्यांच्या सूत्रधारांविरुद्ध निर्णायक कारवाईची नांदी ठरणार आहॆ. कारण गरिबी, कौटुंबिक अडचणी, अपरिपक्वता किंवा पैशांची गरज यांचा गैरफायदा घेऊन एखाद्या मासूम मुलाला गुन्हेगार बनवणे म्हणजे केवळ एका मुलाचे भविष्य उद्ध्वस्त करणे नव्हे, तर समाजाच्या भवितव्यावरच घाला घालणे होय.
नागपुरात कमी वयाच्या मुलांना बहकवून गुन्हेगारीच्या जगात ओढल्याची अनेक प्रकरणे यापूर्वी समोर आली आहेत. काही सराईत गुन्हेगार स्वतः पडद्यामागे सुरक्षित राहून अल्पवयीन मुलांना पुढे करतात आणि त्यांचा गुन्हेगारीसाठी ‘मोहरा’ म्हणून वापर करतात. त्यामुळे एखादा अल्पवयीन गंभीर गुन्ह्यात सापडला की केवळ त्या मुलावर लक्ष केंद्रित न करता, त्याच्या हातात शस्त्र कोणी दिले? त्याला पैसे कोणी दिले? गुन्ह्यासाठी कोणी भडकवले? आणि या संपूर्ण कटामागील खरा सूत्रधार कोण? या प्रश्नांच्या मुळाशी पोहोचणे आता अत्यंत आवश्यक झाले आहे.
BNS कलम 95 काय सांगते?
भारतीय न्याय संहितेचे कलम 95 हे बालकाला गुन्हा करण्यासाठी भाड्याने घेणे, कामाला लावणे किंवा त्याचा वापर करण्याशी संबंधित आहे. त्यामुळे एखाद्या अल्पवयीन मुलाला गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे, त्याचा वापर करणे किंवा गुन्हेगारी कृत्यात त्याला सहभागी करून घेण्याचे पुरावे आढळल्यास या कलमाचा प्रभावी वापर महत्त्वाचा ठरू शकतो. विशेषतः हत्या, प्राणघातक हल्ले, शस्त्रांचा वापर, अमली पदार्थांची वाहतूक किंवा अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनांचा जाणीवपूर्वक वापर करणाऱ्या सूत्रधारांविरुद्ध कायद्यातील उपलब्ध कठोर तरतुदींचा प्रभावी वापर केला जाणार आहॆ. या अंतर्गत 3 ते 10 वर्षापर्यंत कारावास व दांडाची तरतूद आहे.

झोपडपट्टीतील मुलांशी साहूंचा थेट संवाद, दिला विश्वास
या भेटीदरम्यान अपर पोलीस आयुक्त विनीता साहू यांनी झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या काही मुलांशी थेट संवाद साधला. त्यांचे समुपदेशन करत चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याचे मार्गदर्शनही केले. त्यांनी मुलांना समजावून सांगितले की, त्यांचे वय अत्यंत संवेदनशील आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्यांना सहजपणे बहकवू शकतात. कोणी धमकावत असेल, पैशांचे आमिष दाखवत असेल, दबाव टाकत असेल किंवा चुकीचे काम करण्यास भाग पाडत असेल, तर घाबरून न जाता पोलिसांना त्याची माहिती द्यावी. त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलीस मदत करतील, असा विश्वासही त्यांनी मुलांना दिला. यावेळी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांशी सुध्दा त्यांनी संवाद साधला, हे विशेष.
अपर पोलीस आयुक्त विनीता साहू यांनी घेतलेली कठोर भूमिका निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. आता या इशाऱ्याचे रूपांतर ठोस आणि परिणामकारक कारवाईत होणे अपेक्षित आहे. कारण मुलांच्या हातात पुस्तकाऐवजी शस्त्र देणाऱ्यांना कायद्याची भीती वाटलीच पाहिजे आणि मासूम मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करणाऱ्या प्रत्येक पडद्यामागील सूत्रधाराचा चेहरा समाजासमोर येणे आता आवश्यक झाले आहॆ. या प्रसंगी कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुलांच्या हातात शस्त्र देणारा ‘खरा गुन्हेगार’ शोधणार
अल्पवयीन मुलाकडून एखादा गंभीर गुन्हा घडल्यास कायद्यानुसार पुढील प्रक्रिया होईलच; मात्र तपास यंत्रणेने तेवढ्यावरच समाधान मानता कामा नये. त्या मुलाच्या हातात शस्त्र कोणी दिले? त्याला गुन्ह्यासाठी कोणी प्रवृत्त केले? त्याला संरक्षणाचे आश्वासन कोणी दिले? आणि त्याचा मोहरा म्हणून वापर करणारा खरा मास्टरमाइंड कोण? याचा शोध घेऊन त्या सूत्रधारापर्यंत कायद्याचे हात पोहोचून कठोर कारवाई केली जाणार आहॆ.
Author: संतोष तायडे
संपादक











