– ‘सारे भेद सोडूया, माणूस माणूस जोडूया’ म्हणत १४,०६५ फूट उंचीवरील आव्हानात्मक ट्रेक यशस्वी
– राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोख्याचा दिला प्रेरणादायी संदेश
The Exposer
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रेल्वे डाक सेवेचे कर्मचारी धर्मेंद्र मेश्राम व प्रणय वालोंद्रे यांनी हिमाचल प्रदेशातील पीर पंजाल पर्वतरांगांतील प्रसिद्ध आणि अत्यंत आव्हानात्मक ‘हम्पता पास’ ट्रेक यशस्वीपणे पूर्ण करत “सारे भेद सोडूया, माणूस माणूस जोडूया” हा सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश हिमालयाच्या कुशीतून संपूर्ण देशाला दिला आहे.

युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया (YHAI) आयोजित या गिर्यारोहण मोहिमेत देशभरातील ३८ गिर्यारोहकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील नागपूरचे धर्मेंद्र मेश्राम व प्रणय वालोंद्रे यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. मनालीजवळील जॉब्रा येथून सुरू झालेल्या या ट्रेकमध्ये चिका, बालू का घेरा, हम्पता पास, शेआ गोरू आणि छत्रू असा सुमारे २७ किलोमीटरचा प्रवास करण्यात आला.
समुद्रसपाटीपासून १४,०६५ फूट उंचीवर असलेला हा ट्रेक पाच दिवसांत पूर्ण करण्यात आला. कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस, वेगवान वारे आणि खडतर पर्वतीय चढ-उतारांचा सामना करत गिर्यारोहकांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले.
हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक निसर्गरम्य ट्रेकपैकी एक म्हणून ओळखला जाणारा हम्पता पास हिरव्यागार कुरणांपासून बर्फाच्छादित पर्वतरांगा, धबधबे, रंगीबेरंगी फुलांचे गालिचे आणि मनमोहक चंद्रताल सरोवर यांसाठी प्रसिद्ध आहे. जून ते सप्टेंबर हा या ट्रेकसाठी सर्वोत्तम कालावधी मानला जातो.
अशाप्रकारे धर्मेंद्र मेश्राम व प्रणय वालोंद्रे यांनी हम्पता पास सर करून राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश हिमालयाच्या शिखरावरून देशभर पोहोचविला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहॆ.
Author: संतोष तायडे
संपादक











