– कर्जाच्या जाळ्यात अडकवून पाच ते दहा पट वसुली; फोटो मॉर्फ करून ब्लॅकमेलिंग, उच्चशिक्षित सूत्रधार भोपाळजवळून जेरबंद
The Exposer
नागपूर : झटपट कर्जाच्या आमिषाने देशभरातील तब्बल २ लाख ३४ हजार नागरिकांकडून २३४ कोटी रुपयांची सायबर खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा नागपूर सायबर शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कामिल सिद्दीकी (३१) याला मध्य प्रदेशातील भोपाळजवळील बरेसिया येथून अटक करण्यात आली.
संगणक विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कामिलने ‘मस्त मनी’ लोन ॲप तयार केले होते. हे ॲप ५ लाख ३२ हजारांहून अधिक जणांनी डाउनलोड केले. ॲपच्या माध्यमातून मोबाईलमधील फोटो व इतर माहितीचा ॲक्सेस मिळवून १० हजारांच्या कर्जाच्या बदल्यात पाच ते दहा पट रक्कम वसूल केली जात होती. त्यानंतर फोटो मॉर्फ करून ब्लॅकमेलिंग व धमक्यांच्या माध्यमातून खंडणी उकळली जात होती.
नागपूरच्या २१ वर्षीय तरुणीने सायबर शाखेकडे तक्रार केल्यानंतर या महाघोटाळ्याचा उलगडा झाला. तपासात टोळी चार टप्प्यांत काम करत असल्याचे स्पष्ट झाले. एक जण कर्ज देणे, दुसरा वसुली करणे, तिसरा फोटो मॉर्फ करणे आणि चौथा धमकी देऊन खंडणी वसूल करण्याचे काम करत होता.
टोळीतील अन्य तीन उच्चशिक्षित आरोपी फरार असून सायबर शाखा त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, कोणतेही लोन ॲप डाउनलोड करताना त्याला मोबाईलमधील फोटो, कॉन्टॅक्ट्स किंवा इतर माहितीचा अनावश्यक ॲक्सेस देऊ नये, असे आवाहन सायबर शाखेने केले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











