‘मसाज’च्या नावाखाली देहव्यापाराचा बाजार! गोपालनगरातील स्पावर क्राइम ब्रँचचा छापा; दोन तरुणींची सुटका

– ‘मॅजिक कृष स्पा अँड सलून’च्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

The Exposer
नागपूर : मसाज आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा क्राइम ब्रँचच्या सोशल सिक्युरिटी ब्रँचने (एसएसबी) पर्दाफाश केला आहे. गोपालनगर परिसरातील ‘मॅजिक कृष स्पा अँड सलून’ वर गुरुवारी धाड टाकून दोन तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी स्पा संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्राइम ब्रँचचे पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबी पथकाने ही कारवाई केली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्लॉट क्रमांक ११, तिसरा बस स्टॉप येथे असलेल्या स्पामध्ये मसाज सेंटरच्या आड कथित देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहितीची खातरजमा करण्यासाठी एसएसबीने प्रथम एक डमी ग्राहक पाठविला. माहिती खरी असल्याची पुष्टी होताच पंचांच्या उपस्थितीत दुपारी सुमारे ३.३५ वाजता स्पावर छापा टाकण्यात आला. पोलिसांच्या तपासात, अधिक कमाईचे आमिष दाखवून तरुणींना देहव्यापारात ढकलले जात असल्याचा आरोप समोर आला. ग्राहकांना स्पा सेवेच्या नावाखाली तरुणी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी स्पा संचालक सोमेश राजेश मंडले (३०), रा. हिल टॉप, पांढराबोडी याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३(२), १४३(३) सह अन्य संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाप्यातून मुक्त करण्यात आलेल्या दोन्ही तरुणींच्या संरक्षण आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या नेतृत्वात हवालदार राम निरगुडवार, नायब पोलीस शिपाई शेषराव राऊत, पोलीस शिपाई अश्विन मांगे, कुणाल मसराम, समीर शेख, आरती चौहान आणि पूनम शेंडे यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More