– क्राइम ब्रांच युनिट-३ ची धडक कारवाई; आरोपीला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
The Exposer
नागपूर : स्वस्त दरात यूएसडीटी (USDT) आणि क्रिप्टोकरन्सी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत नागपुरातील किराणा व्यावसायिकाची तब्बल १९ लाख रुपयांनी फसवणूक करणाऱ्या सायबर आरोपीला नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून अटक केली. पोलब पार्थ सरकार (वय २३, रा. मलिक पारा, नरसिंग धाम रोड, आसनसोल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टिमकी परिसरातील किराणा व्यावसायिक रोहित जाघरे यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून लखनऊ येथील अर्श सिद्दीकी याच्याशी ओळख झाली होती. अर्शने बाजारभावापेक्षा कमी किमतीत, म्हणजेच प्रत्येकी ८० रुपयांत यूएसडीटी आणि क्रिप्टोकरन्सी उपलब्ध करून देण्याचे आमिष रोहित यांना दाखवले.
या आमिषाला बळी पडून रोहित यांनी आरोपी पोलब पार्थ सरकार याच्या बँक खात्यात सुमारे १९ लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी ना क्रिप्टोकरन्सी दिली, ना पैसे परत केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रोहित यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट-३ कडे सोपविण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांचे पथक पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे पोहोचले. तेथून आरोपी पोलब पार्थ सरकार याला ताब्यात घेऊन नागपुरात आणण्यात आले.
गुरुवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या फसवणुकीत आणखी आरोपींचा सहभाग आहे का, तसेच फसवणुकीची व्याप्ती किती मोठी आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर यांच्या नेतृत्वात युनिट-३ चे उपनिरीक्षक मधुकर काठोके, एएसआय संतोष ठाकूर, हवालदार विजय श्रीवास, मनोज नेवारे, पोलीस शिपाई दीपक लकडे, दीपक दासलवार, जितेश रेड्डी, सहदेव चिकले, चंद्रकांत, विशाल आणि प्रमोद यांच्या पथकाने केली.
Author: संतोष तायडे
संपादक











