ब्लॅकबोर्डवर लिहिली अखेरची चिठ्ठी; ‘माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही’

कौटुंबिक तणाव आणि घटस्फोटानंतर मानसिक तणावात होती ३८ वर्षीय महिला; मानकापूर परिसरातील घटना

The Exposer
नागपूर : मुलीच्या अभ्यासासाठी घरात असलेल्या ब्लॅकबोर्डवर ‘माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही’ असा अखेरचा संदेश लिहून ३८ वर्षीय महिलेने आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत महिलेची ओळख मीनल महेंद्र धोंगडे (वय ३८) अशी असून, त्या समता चौकातील पूजा रेसिडेन्सी परिसरात आपल्या आई-वडिलांसोबत राहत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही वर्षांनी पती-पत्नीच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मागील दोन वर्षांपासून मीनल माहेरी राहत होत्या, तर सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्या मानसिक तणावातून जात होत्या. त्यांची ११ वर्षीय मुलगीही त्यांच्यासोबत राहत होती.

मुलगी रुग्णालयात अन् घरी घडली दुर्दैवी घटना

घटनेच्या दिवशी मीनल यांच्या ११ वर्षीय मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलीसाठी जेवण घेऊन मीनल यांचे आई-वडील रुग्णालयात गेले होते. त्यामुळे त्या घरी एकट्याच होत्या.

दुपारी सुमारे दोन वाजता आई-वडील घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ आवाज देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. मीनल यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ब्लॅकबोर्डवरील संदेशाने वेधले लक्ष

घटनेनंतर घराची पाहणी करताना मुलीच्या अभ्यासासाठी असलेल्या ब्लॅकबोर्डवर इंग्रजीत “No one is responsible for my end…” असा संदेश लिहिलेला आढळून आला. आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा आशय या संदेशातून व्यक्त करण्यात आला होता.या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, घटनेमागील नेमक्या परिस्थितीचा पुढील तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More