प्रेमविवाहाचा राग अनावर; गर्भवती बहिणीच्या पतीवर चार भावांचा जीवघेणा हल्ला!

– घटस्फोटासाठी दबाव टाकण्याचा आरोप; बहिणीने सोबत जाण्यास नकार देताच पतीला बेदम मारहाण, लकडगंज पोलिसांत गुन्हा

नागपूर : कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून गर्भवती बहिणीच्या पतीवर तिच्याच चार भावांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. बहिणीला जबरदस्तीने सोबत नेण्यासह पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप असून, पीडिताच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वीपर कॉलनी परिसरात राहणारा तुषार (वय २५) हा एका ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीत काम करतो. सुमारे एक वर्षापूर्वी त्याने कुटुंबीयांच्या विरोधानंतरही १९ वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह केला होता. दोघांचा संसार सुरळीत सुरू असून, तरुणी सध्या तीन महिन्यांची गर्भवती आहे.

बुधवारी सकाळी तरुणीचे भाऊ जाहिद, मतीन, उमेर आणि साहिद हे तुषारच्या घरी पोहोचले. आरोपानुसार, त्यांनी आपल्या बहिणीला जबरदस्तीने सोबत नेण्याचा प्रयत्न केला आणि तुषारपासून घटस्फोट घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. मात्र, तरुणीने भावांसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला.

यावेळी तुषारने विरोध करताच चौघांनी त्याच्याशी वाद घालत बेदम मारहाण केली आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित तुषारने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तुषारच्या तक्रारीवरून पोलिसांनी जाहिद, मतीन, उमेर आणि साहिद या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More