– सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्याचा छडा; पाच विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
The Exposer
नागपूर : कळमना परिसरातील हार्डवेअर दुकानात घरफोडी करून पितळी नळाचे नोझल, मोबाईल आणि चांदीचा शिक्का लंपास करणाऱ्या अल्पवयीन टोळीचा कळमना पोलिसांच्या डीबी पथकाने पर्दाफाश केला. या प्रकरणात पाच विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेला ६९ हजार ५०० रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपराध क्रमांक ६१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींनी हार्डवेअर दुकानात प्रवेश करून दुकानातील पितळी नळाचे नोझल, मोबाईल फोन आणि चांदीचा शिक्का असा एकूण ६९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत कळमना पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. तसेच गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करून संशयितांची माहिती मिळविण्यात आली.
तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पाच विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेला ६९ हजार ५०० रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कळमना पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे वेगाने तपास करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, तपास प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संतोषकुमार रामलोड, पोलिस हवालदार रविकुमार शाहू, प्रवीण पवार, मंगेश लोही, पोलिस अंमलदार संतोष पांडे, अनिल जाधव, प्रफुल्ल गोहोकार यांनी केली.
Author: संतोष तायडे
संपादक











