– दोन आरोपी गजाआड, विधीसंघर्ष बालक ताब्यात; चार फरार साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची मोहीम सुरू
The Exposer
नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध तस्करीला मोठा धक्का देत सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेच्या पथकाने कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करून 10 लाख 53 हजार 750 रुपयाचा 42.150 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत गांजा व किया सेलटॉस कारसह एकूण 25 लाख 88 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एका विधीसंघर्ष बालकालाही ताब्यात घेण्यात आले असून या रॅकेटमधील आणखी चार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. ही कारवाई शनिवारी (18 जुलै) न्यू ओम साई नगर, जुना कामठी रोड येथील प्लॉट क्रमांक 125/जी शेजारील मोकळ्या जागेवर करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी सुरज उर्फ सूर्यवंशी प्रकाश उईके (वय 30) आणि अब्दुल साहिल अब्दुल शफिक (वय 26) यांना किया सेल्टॉस कारमधून गांजाची वाहतूक करताना रंगेहात पकडले.
कारवाईदरम्यान 42.150 किलो गांजा (किंमत ₹10,53,750), किया सेल्टॉस कार (₹15 लाख) आणि तीन मोबाईल फोन (₹35 हजार) असा एकूण ₹25,88,750 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 656/2026 अंतर्गत एनडीपीएस कायदा कलम 8(क), 20(ब)(2)(क) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे फिर्यादी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे आहेत.
दरम्यान, या रॅकेटमधील अक्षय सूर्यवंशी, अक्षय (ओडिशा), सादिक आणि निलेश डोरसे हे चार आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या कारवायांमध्ये ही आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











