– तोंडावर मास्क, हातात तिरंगा घेऊन अनोखे आंदोलन; NEET प्रश्नपत्रिका गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
The Exposer
नागपूर : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) संलग्न आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन, नागपूर जिल्ह्याच्या वतीने रविवारी संविधान चौक येथे अनोख्या पद्धतीने मुक आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान आशा वर्कर्सनी तोंडावर मास्क लावून आणि हातात तिरंगा ध्वज घेऊन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
कॉ. राजेंद्र साठे, कॉ. प्रीती मेश्राम आणि कॉ. रंजना पौनीकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने आशा वर्कर्स सहभागी झाल्या. आंदोलनाची शांततापूर्ण आणि वेगळी पद्धत पाहून नागरिकांसह माध्यमांचेही लक्ष वेधले गेले.
यावेळी बोलताना कॉ. राजेंद्र साठे यांनी नीट (NEET) प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणांमध्ये केंद्र सरकारने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही ते म्हणाले.
दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी आंदोलकांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी केली.
या आंदोलनात कॉ. विठ्ठल जुनघरे, कॉ. प्रमोद कावळे, कॉ. उज्वला कांबळे, संजय अंभोरे, नालंदा गणवीर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Author: संतोष तायडे
संपादक











