– युनियन बँक ऑफ इंडियापासून सोमलवार स्कूलपर्यंत एकाच बाजूने वाहतूक; शाळा सुटण्याच्या वेळी तातडीने वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी
The Exposer
नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील प्रतापनगर परिसरात युनियन बँक ऑफ इंडियापासून सोमलवार स्कूलपर्यंत रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरू असल्याने सध्या एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. मात्र पावसाळ्यात सुरू असलेल्या कामामुळे माती व चिखल रस्त्यावर पसरल्याने वाहन घसरण्याचे प्रकार वाढत असून, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी गंभीर धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्याची नागरिकांची तक्रार आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अरुंद झालेल्या रस्त्यावर वाहनचालकांकडून ओव्हरटेक करण्याचे प्रकार, संथ गतीने आणि शिस्तबद्ध वाहतूक न होणे यामुळे रोजच वाहतूक कोंडी होत आहे. शाळेच्या वेळेत विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
याशिवाय, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे साहित्य वाहून नेणारे ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभे राहत असल्याने उपलब्ध रस्ता आणखी अरुंद होत असून वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांनी महापालिका व वाहतूक पोलिसांकडे पुढील तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे:
दोन्ही बाजूंचे रस्ते पूर्णपणे सुरू होईपर्यंत वाहतूक पोलीस तैनात करावेत. शाळा सुटण्याच्या वेळेत एका बाजूची वाहतूक तात्पुरती नियंत्रित किंवा बंद करून विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा. रस्त्यावर साचलेली माती व चिखल तातडीने हटवून घसरण टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. ठेकेदाराच्या वाहनांचे व ट्रकचे रस्त्यावर होणारे पार्किंग त्वरित हटवावे.
याविषयी स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “प्रशासन एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जागे होणार का? की त्याआधीच या गंभीर समस्येची दखल घेऊन प्रभावी उपाययोजना करणार?” आता या संवेदनशील प्रश्नावर नागपूर महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











