महाज्योतीत पदोन्नती की ‘बंगला ड्युटी’? शिपायाकडून खाजगी बंगल्यावर काम करून घेतल्याच्या चर्चेने खळबळ

– शासकीय वेतनावर कार्यालयाऐवजी खाजगी बंगल्यावर काम करून घेत असल्याची चर्चा; ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्थापन संस्थेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह

The Exposer
नागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकासासाठी कार्यरत असलेल्या महाज्योती संस्थेत गंभीर गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप समोर आला आहे. संस्थेतील एका शिपायाला कथितरित्या टंकलेखक पदावर पदोन्नती देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात त्याच्याकडून कार्यालयीन कामाऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खाजगी बंगल्यावर घरगडीप्रमाणे काम करून घेतले जात असल्याची चर्चा संस्थेत आणि प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी दररोज सकाळी कार्यालयात येऊन बायोमेट्रिक हजेरी नोंदवितो. त्यानंतर दिवसभर तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खाजगी बंगल्यावर राहून घरगुती कामे, कुटुंबीयांची सेवा तसेच इतर वैयक्तिक कामे करतो आणि सायंकाळी पुन्हा कार्यालयात येऊन बायोमेट्रिक हजेरी नोंदवत असल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर अलीकडेच अधिकाऱ्यांच्या खाजगी बंगल्याच्या डागडुजीची कामेही याच कर्मचाऱ्याच्या देखरेखीखाली पूर्ण करून घेण्यात आल्याची चर्चा आहे.

कार्यालयीन कर्मचाऱ्याची नियुक्ती कार्यालयीन कामासाठी असताना, कमी वेतनाच्या शिपायाला टंकलेखक पदावर पदोन्नती देऊन प्रत्यक्षात वैयक्तिक कामांसाठी राबवून घेतले जात असल्याची उलटसुलट चर्चा कर्मचारी वर्गात सुरू आहे. यामुळे ही पदोन्नती नेमकी कार्यालयीन गरज म्हणून देण्यात आली की इतर कोणत्या कारणासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या टंकलेखक पदी कार्यरत कर्मचाऱ्याला शासनाकडून दरमहा 32 हजार 430 रुपये वेतन दिले जात असल्याने शासकीय निधीचा गैरवापर होत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, नागपूर येथील महाज्योती कार्यालयात सुमारे 48 कर्मचारी कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत कार्यालयीन कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्याचा वापर वैयक्तिक सेवेसाठी होत असेल, तर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची चर्चा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हा कथित प्रकार गेल्या चार – पाच महिन्यांपासून सुरू असून संस्थेच्या कर्मचारी वर्गात याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. जेव्हा की या कर्मचाऱ्याला कार्यालयातील साधी फाईल ही हाताळता येत नाही, त्यामुळे या कर्मचाऱ्याला देण्यात आलेल्या पदोन्नतीचा आधार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहॆ. या प्रकरणामुळे राज्यभरातील महाज्योतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्वतंत्र चौकशीची मागणीही जोर धरत आहे.

दरम्यान, कार्यालय तसेच संबंधित खाजगी बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास संबंधित कर्मचारी प्रत्यक्षात दिवसभर कुठे व कोणते काम करत होता, याबाबतचे वास्तव समोर येऊ शकते, असेही बोलले जात आहे.

जर हे आरोप चौकशीत खरे ठरले, तर शासकीय वेतनावर नियुक्त कर्मचाऱ्याचा वैयक्तिक कामांसाठी वापर करणे ही अत्यंत गंभीर बाब ठरू शकते. तसेच, शासनाच्या निधीचा उद्देशापासून विपरीत वापर झाला का, याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

टीप : या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच महाज्योती प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची बाजू उपलब्ध होताच तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More