अंबाझरी रोडवर मृत्यूचा थरार; एसटी बसच्या धडकेत दूधवाहू वाहन तिघांवर आदळले, एकाचा जागीच मृत्यू

– एलईडी चौकातील भीषण अपघातात तिघे जखमी; एसटी बस व टाटा इंट्रा वाहनाचे मोठे नुकसान, वाहतूक ठप्प

The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील अंबाझरी रोडवरील इंदिरा गांधी रुग्णालय (एलईडी) चौकात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. एसटी महामंडळाची बस आणि दूधवाहू टाटा इंट्रा वाहन यांच्यात झालेल्या जोरदार धडकेमुळे दूधवाहू वाहन थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर जाऊन आदळल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल दूध वाहून नेणारे टाटा इंट्रा कमर्शिअल वाहन (क्र. MH-31 GD-0585) हे रामनगरकडून अभ्यंकरनगर चौकाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी शंकरनगर चौकाकडून अंबाझरी टी-पॉईंटच्या दिशेने येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने (क्र. MH-40 Y-5127) या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टाटा इंट्रा वाहन नियंत्रण सुटून चौकात उभ्या असलेल्या तिघा नागरिकांवर जाऊन कोसळले.

या अपघातात सुनील आनंदराव जाधव (वय ६५, रा. कॉर्पोरेशन कॉलनी, नागपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनील कुशालराव गुडदे (वय ६२, रा. गांधीनगर, अंबाझरी), शैलेंद्र मारोतराव किनगावकर (वय ६२, रा. कॉर्पोरेशन कॉलनी) आणि टाटा इंट्रा चालक अभिषेक दुर्गाप्रसाद जगणे (वय २३, रा. खापरखेडा, कोराडी रोड) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर चौकात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. माहिती मिळताच पोलिस व आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. काही काळ अंबाझरी रोडवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.

या भीषण अपघातामुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, एलईडी चौकातील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More