– पाण्यात बुडाले वीज पॅनेल, पुरवठा बंद ठेवण्याचा दिला होता सल्ला
– शिवीगाळ, धमक्या व मारहाणप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
The Exposer
नागपूर : पावसामुळे पाण्यात बुडालेल्या वीज पॅनेलमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद ठेवण्याचा सल्ला देणे महावितरणच्या कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले. सुरक्षेचा सल्ला दिल्याच्या रागातून कर्मचाऱ्यावर शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दत्तात्रय वानखेडे व त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज प्रभाकर जिचकार (वय ३२) हे महावितरण कंपनीत तंत्रज्ञ (लाईनमन) म्हणून कार्यरत आहेत. २८ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी येत होत्या. दुपारी जयताळा रोड येथील गणराज सेलिब्रेशन हॉलच्या तळमजल्यात पाणी साचून वीज मीटर व वीज पॅनेलपर्यंत पाणी पोहोचल्याची माहिती मिळाल्यानंतर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित ठिकाणचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला.
सायंकाळी सुमारे ४ वाजता महावितरणचे पथक घटनास्थळी पाहणीसाठी पोहोचले असता, वीज पॅनेलजवळ अद्याप पाणी साचलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परिस्थिती सुरक्षित होईपर्यंत वीजपुरवठा सुरू करणे धोकादायक असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, याच कारणावरून आरोपी दत्तात्रय वानखेडे व त्यांच्या साथीदारांनी संताप व्यक्त करत कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली तसेच कानशिलात लगावून ढकलाढकली केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपीच्या साथीदारांनीही मनोज जिचकार यांना जमिनीवर पाडून हाताबुक्क्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, ३५१(२), ३५(ब) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
संघटनेने पोलिस ठाणे गाठत केला निषेध

घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नागदेवते, सहाय्यक अभियंता चिंतलवार, सहाय्यक अभियंता ताकसांडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती घेतली. तसेच वर्क्स फेडरेशनचे पदाधिकारी सुजित पाठक, पंकज खोडे, रोशन मोंढरे, आशिष अतकरी, सचिन शिंदे, पंकज मघाडे, लता टेकाम आणि संघटनेचे अन्य सदस्यही पोलिस ठाण्यात उपस्थित राहून कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

Author: संतोष तायडे
संपादक











