पत्नीच्या भेटीसाठी तिरोडा गाठले अन पोलिसांच्या सापळ्यात अडकला ‘इक्का’!

– ‘रायफल’ला सोबत घेऊन नागपुरातून थेट दुचाकीने पलायन?

The Exposer
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वैध ताब्यातून धाडसी पद्धतीने फरार झालेला अट्टल घरफोड्या इक्का उर्फ हर्ष महेंद्र रामटेके (वय २५, रा. तिरोडा, जि. गोंदिया) याला अखेर तब्बल २४ तासांच्या थरारक शोधमोहीमेनंतर तिरोडा पोलिसांना पहाटेच्या सुमारास जेरबंद करण्यात यश आले. या अटकेमुळे पोलिस दलाने सुटकेचा निःश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मानेवाडा स्मशानभूमीतील पवन सूर्यवंशी हत्याकांडातील आरोपींसह इक्काला हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी एका आरोपीला शौचालयात नेण्यात आले असताना इक्कानेही शौचालयात जाण्याची मागणी केली. लॉकअप गार्ड त्याला बाहेरील शौचालयात घेऊन गेला असता, संधी साधून त्याने पोलिसांची नजर चुकवत क्षणार्धात पलायन केले.

आरोपी फरार झाल्याची माहिती मिळताच पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. लगेच शहरासह जिल्हाभर नाकाबंदी करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांसाठी ही केवळ आरोपीला पकडण्याची मोहीम नव्हती, तर प्रतिष्ठेची लढाई बनली होती.

पानठेल्यावरून साधला पत्नीशी संपर्क?

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यातून पसार झाल्यानंतर इक्काने सर्वप्रथम एक पानठेला गाठला. तेथून त्याने एकाच्या मोबाईलवरून पत्नीशी संपर्क साधला. दरम्यान नागपुरातील आपल्या एका अल्पवयीन मित्राशी संपर्क साधला. यानंतर इक्का ‘रायफल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मित्राला सोबत घेऊन दुचाकीवरून तिरोड्याकडे रवाना झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, ‘रायफल’ हे कोणतेही अग्निशस्त्र नसून त्याच्या मित्राचे टोपणनाव असल्याचे सांगितले जाते. मात्र, या संपूर्ण घटनाक्रमाला अद्याप पोलिस विभागाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

तिरोडा पोलिसांचे प्रत्येक हालचालीवर होते लक्ष 

प्राप्त माहितीनुसार, इक्का हा बालपणापासूनच अट्टल घरफोड्या असून त्याचे वडील भंगार व्यवसाय करतात. हे कुटुंब मूळचे तुमसर येथील असून नंतर तिरोडा येथे स्थायिक झाले. इक्का विवाहित असून त्याला पत्नी, लहान भाऊ आणि बहीण आहे. पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर तो थेट पत्नीला भेटण्यासाठी तिरोडा येथे गेल्याची माहिती समोर येत आहे. याच हालचालीची माहिती मिळाल्यानंतर तिरोडा पोलिसांनी सापळा रचला आणि पहाटेच्या सुमारास त्याला जेरबंद केले.

दरम्यान, २७ जुलै २०२६ रोजी आरोपी इक्का नागपुरातून फरार झाल्याची माहिती मिळताच तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने यांनी संभाव्य सर्व ठिकाणी पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते, हे विशेष. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित वानखडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. तर तिरोडा पोलिस इक्कावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याची माहिती आहॆ.

संपूर्ण नेटवर्कची पोलिसांकडून कसून चौकशी

दरम्यान, इक्काच्या नागपुरातील मित्रपरिवार, त्याला पलायनासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संपूर्ण नेटवर्कची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे. फरार होण्यापासून अटकेपर्यंतच्या प्रत्येक हालचालीचा तपास तांत्रिक आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे केला जात असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे, इक्काच्या पलायन प्रकरणाची वरिष्ठानी गंभीर दखल घेतली असून हुडकेशवर पोलिस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांचा कसूरी अहवाल पाठविण्यात आल्याची चर्चा आहॆ.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More