– वर्षभर मनात पेटलेला राग अखेर रक्तपातात; नागरिकांच्या धाडसाने आरोपी जेरबंद
The Exposer
नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसर सोमवारी सकाळी रक्तरंजित हल्ल्याने हादरून गेला. वर्षभरापासून मनात सूडाची आग बाळगून बसलेल्या एका माजी भाडेकरूने तलवार आणि चाकू घेऊन थेट घरात घुसत जुन्या घरमालकाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला चढविला. अवघ्या काही मिनिटांत एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला. आरोपीने धारदार तलवार आणि चाकूने वार करून घरमालकाची मेव्हणी संगीता राजू चौधरी (४०) हिची जागीच हत्या केली. तर घरमालक धर्मपाल सुदाम डहाट (५१) आणि त्यांची पत्नी वनिता डहाट (४८) हे गंभीर जखमी झाले.
भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ पसरली. पोलिसांनी घटनास्थळावरून रोशन नीलकंठ तराळ (३०) याला अटक केली. तो मूळचा नरखेड तालुक्यातील मोवाड येथील रहिवासी असून सध्या एमआयडीसीतील राजीवनगर येथे वास्तव्यास होता. सुमारे वर्षभरापूर्वी तो धर्मपाल डहाट यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. त्या काळात मोठ्या आवाजात रेडिओ लावणे, गैरवर्तन करणे आणि शिस्तभंगाच्या प्रकारांवरून घरमालक त्याला वारंवार समज देत होते. याच गोष्टींचा राग मनात धरून आरोपीने सूड उगविण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सकाळी आरोपी तलवार आणि चाकू घेऊन थेट धर्मपाल डहाट यांच्या घरी पोहोचला. हॉलमध्ये बसलेल्या धर्मपाल यांच्यावर त्याने कोणतीही शाब्दिक बाचाबाची न करता थेट तलवारीने सपासप वार सुरू केले. स्वतःचा बचाव करताना धर्मपाल यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली, तर चेहऱ्यावरही घाव बसले. पतीचा आरडाओरडा ऐकून वनिता डहाट मदतीसाठी धावत आल्या. मात्र आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले.
गंभीर जखमी अवस्थेतही दोघांनी कसाबसा घराबाहेर पडून जीव वाचवला. दरम्यान, घरात पाहुण्या म्हणून आलेल्या धर्मपाल यांच्या मेव्हणी संगीता चौधरी या स्वयंपाकघरातून बाहेर येताच आरोपीने त्यांच्यावर तलवारीने प्राणघातक वार केले. रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन निघालेल्या संगीता या घराबाहेर येताच रस्त्यावर कोसळल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी तलवार हातात घेऊन घराबाहेर आला आणि परिसरातील नागरिकांना धमकावत पुन्हा घरात घुसला. मात्र प्रसंगावधान राखत काही धाडसी युवकांनी घराचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि तत्काळ एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.
त्यामुळे आरोपीचा पळून जाण्याचा डाव फसला. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुळ महाजन आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून आरोपीला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून जखमी धर्मपाल आणि वनिता डहाट यांच्यावर वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी केली असून आरोपीविरुद्ध खुनासह खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात वर्षभरापासून मनात साचलेला राग आणि सूडाची भावना हेच या रक्तरंजित हल्ल्यामागील प्रमुख कारण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एमआयडीसी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

Author: संतोष तायडे
संपादक











