घरफोड्यांचा कर्दनकाळ!; रवींद्र राजुलवार यांच्या नेतृत्वाखाली फ्रेजरपुरा पोलिसांचा धडाकेबाज ‘स्ट्राईक’!

– दोघांना अटक, ९ गुन्ह्यांची उकल; ₹24.22 लाखांचा मुद्देमाल जप्त
– पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी तपास पथकाची केली प्रशंसा

The Exposer
अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याने घरफोडी व दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश करत सलग गुन्हे करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ₹24,22,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे गाडगेनगर, राजापेठ, बडनेरा आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त श्याम धुगे तसेच सहायक पोलीस आयुक्त कैलास फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या नेतृत्वातील तपास पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

डी.बी. पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपी भारत दिलीप पवार (वय २५) व पवन सुभाष चक्रे (वय ३२) या दोघांना अटक करण्यात यश मिळविले. चौकशीत आरोपींनी केवळ सदर गुन्ह्याचीच नव्हे, तर मागील दीड वर्षात शहरातील विविध भागांमध्ये केलेल्या अनेक घरफोड्या व मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तपासात गाडगेनगर, राजापेठ, बडनेरा आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतील नऊ गुन्हे उघडकीस आले.

आरोपींकडून १३४ ग्रॅम ९७० मिलीग्रॅम सोन्याचे दागिने (₹18.58 लाख), ₹3.69 लाखांची रोख रक्कम आणि चार दुचाकी वाहने (₹1.95 लाख) असा एकूण ₹24.22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या संपूर्ण कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. प्रमुख पो.उप.नि. राहुल महाजन आणि त्यांच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध, वेगवान आणि परिणामकारक तपास करून आरोपींना गजाआड केले. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दाखविलेली समन्वयाची क्षमता, तांत्रिक तपासाचा प्रभावी वापर आणि गुन्हे उघडकीस आणण्यातील कार्यक्षमतेमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी स्वतः फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भेट देऊन तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येऊन केलेला हा सन्मान पोलिस दलासाठी मोठी प्रेरणा ठरला. यावेळी पोलीस आयुक्तांनी तपास पथकाचे विशेष अभिनंदन करत भविष्यातही अशाच कर्तव्यदक्षतेने व समर्पणाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करण्याचे आवाहन केले.

फ्रेजरपुरा पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील घरफोडी व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या नेतृत्वाखाली अमरावती शहर पोलिसांची गुन्हेगारांविरुद्धची आक्रमक मोहीम अधिक तीव्र झाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More