– विशेष पथकाचा धडाकेबाज छापा, ११ आरोपी ताब्यात
– ₹६७ हजारांचा मुद्देमाल जप्त, मोहीम आणखी तीव्र होणार
The Exposer
नागपूर : शहरातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेला आणखी वेग देत पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिसाळ ले-आऊट परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. दुसरीकडे, विशेष पोलिस पथकाच्या कारवाईने जरीपटका पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी उलट सुलट चर्चा आहॆ.
पोलिसांनी या कारवाईत जुगार खेळताना आढळलेल्या ११ आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून रोख ₹३४ हजार, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण ₹६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या निर्देशानुसार शहरातील अवैध व्यवसायांवर लगाम घालण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक भगवान कोळी यांना संबंधित ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नियोजनबद्ध सापळा रचून अचानक छापा टाकण्यात आला.
पोलिसांचे पथक पाहताच काही जणांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेत कारवाई पूर्ण केली. घटनास्थळी जुगार सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सर्व आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी विशेष पथकाचे प्रमुख सहाय्य्क पोलिस निरीक्षक भगवान कोळी, पोलिस हेड कॉस्टेबल अनुप लोलूसरे, पोलिस कॉस्टेबल अर्षद शेख, योगेश सोनवणे, साहिल भोयर, चालक पोलिस शिपाई आनंद चौरागडे यांनी केली. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी विशेष पथकाच्या कामगिरीची प्रसंशा करीत बक्षीस जाहीर केले आहॆ, हे विशेष.
जरीपटका पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी उलट सुलट चर्चा
दुसरीकडे, विशेष पोलिस पथकाच्या कारवाईने जरीपटका पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी उलट सुलट चर्चा आहॆ. तर या कारवाईमुळे अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष पथकाची धडक मोहीम यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Author: संतोष तायडे
संपादक











