साक्ष बदलण्यासाठी थेट अपहरणाचा कट उघड; वकिलासह चौघे जेरबंद! 

– उमरेडमधील हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला मारहाण, जीवे मारण्याची धमकी

The Exposer
नागपूर : उमरेडमधील गाजलेल्या शुभम दमडू हत्याकांडात न्यायालयीन प्रक्रियेलाच धक्का देण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण करून त्याला रात्रभर डांबून ठेवत मारहाण करण्यात आली. न्यायालयात साक्ष बदलण्यासाठी दबाव टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उमरेड पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये ॲड. रमेश रावलानी, राकेश महाकाळकर, प्रद्युम्न कोरटकर आणि अक्षय पाटील यांचा समावेश आहे. उमरेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनाजी जळक यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये शुभम दमडू यांच्या हत्येप्रकरणात अरुण (नाव बदललेले) हा महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. २८ जुलैच्या रात्री राकेश महाकाळकर, प्रद्युम्न कोरटकर आणि अक्षय पाटील हे तिघे त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून रानबोडी गावातील एका शेतात नेले.

तेथे त्याला रात्रभर डांबून ठेवून मारहाण करण्यात आली आणि न्यायालयात साक्ष बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच साक्ष दिल्यास ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. दुसऱ्या दिवशी साक्षीदाराला नागपूर न्यायालयात आणण्यात आले. तेथेही ॲड. रमेश रावलानी यांनी साक्ष बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. मात्र, न्यायालयात हजर झाल्यानंतर साक्षीदाराने न्यायाधीशांसमोर संपूर्ण घडलेला प्रकार उघड केला.

अपहरण, मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्यांची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्देशानंतर उमरेड पोलिसांनी चौघांविरुद्ध अपहरण, मारहाण, धमकी आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून सर्व आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे न्यायालयीन प्रक्रियेवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More