महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्जांना वेग; पात्र विद्यार्थ्यांनी तातडीने अर्ज करा!

– 2025-26 व 2026-27 मधील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
– महाआयडी तयार करून ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य
– समज कल्याण विभागाने महाविद्यालयांनाही दिले निर्देश

The Exposer
नागपूर : समाज कल्याण विभागाच्या महाडीबीटी (MahaDBT 2.0) पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून, सन 2025-26 व 2026-27 या शैक्षणिक वर्षात नागपूर विभागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी तातडीने ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागातील सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित व कायम अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी महाडीबीटी 2.0 पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा. नवीन तसेच नूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज https://mahadbt2.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरता येणार आहेत.

महाआयडी तयार करणे आवश्यक

इयत्ता ११ वी, १२ वी, तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकाच्या आधारे महाआयडी (MahaID) तयार करणे अनिवार्य आहे. तसेच आधार कार्डवरील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

कागदपत्रे आधीच तयार ठेवा

विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक कागदपत्रे स्पष्ट वाचता येतील अशा पीडीएफ स्वरूपात तयार ठेवावीत. त्यामुळे अर्ज भरताना कोणतीही अडचण येणार नाही.

प्रवेश प्रक्रियेचाच महत्त्वाचा भाग

समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे की, शिष्यवृत्ती अर्ज भरणे हा प्रवेश प्रक्रियेचाच अविभाज्य भाग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रत संबंधित महाविद्यालयात जमा करावी. तसेच महाविद्यालयांनीही प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन ते तातडीने समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने अर्ज करून शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे समाज कल्याण विभागाने आवाहन केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More