नागपुरात ड्रग्ज माफियांना पुन्हा मोठा दणका!

– अमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई -1.3 किलो गांजा जप्त, एक अटकेत तर एक फरार

The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुन्हा एकदा धडक कारवाई करत 1 किलो 300 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत ₹32,500) जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, एनडीपीएस कायद्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला एक सराईत संशयित अद्याप फरार आहे.

ही कारवाई दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10.30 ते 3 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 12.50 दरम्यान राणी भोसले नगर झोपडपट्टी, महाकाली शीतला माता मंदिराजवळ, सक्करदरा परिसरात करण्यात आली.

पोलिसांनी विकी रमेश दुबे (रा. राणी भोसले नगर झोपडपट्टी, सक्करदरा) याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणात असलम खान उर्फ भुरू दाऊद खान हा आरोपी अद्याप फरार असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत तीन गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच तो सक्करदरा पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार अरविंद बेडेकर (अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा) यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(ब)(2)(ब) व 29 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध साखळीवर आणखी एक मोठा आघात झाल्याचे मानले जात असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More