– पहाटेची धडक कारवाई! 15 ग्रॅम एमडीसह ड्रग्ज तस्कर जेरबंद
The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने लक्कडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे धडक कारवाई करत ग्रॅम एमडी मेफेड्रोन सदृश्य अमली पदार्थ दुचाकी आणि मोबाईलसह एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एनडीपीएस कायद्यातील रेकॉर्डवरील आणखी एक आरोपी फरार आहे.
ही कारवाई 6 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 2.50 ते 4.50 वाजण्याच्या दरम्यान लक्कडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी मंगळवारी परिसरात करण्यात आली.
पोलीस हवालदार इम्रान शेख (अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा) यांच्या फिर्यादीवरून लक्कडगंज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम 8(क), 22(ब) व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी मोहम्मद सोहेल अब्दुल गफ्फार शेख (वय 29, रा. किल्ला रोड, महाल) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 15 ग्रॅम एमडी सदृश्य पावडर (किंमत ₹1.50 लाख), एक मोबाईल (₹10 हजार) आणि पांढऱ्या रंगाची बर्गमन दुचाकी (अंदाजे ₹1.20 लाख) असा एकूण ₹2.80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणातील मोहम्मद नौशाद इम्रान मलिक (वय 25, रा. दीपनगर, भांडेवाडी) हा आरोपी फरार असून, तो यापूर्वीही एनडीपीएस कायद्यातील गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचा शोध सुरू असून, पुढील तपास लक्कडगंज पोलीस करीत आहेत.

Author: संतोष तायडे
संपादक











