सिम्बायोसिस कॉलेजमागील जंगलात रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह

– डोक्यावर दगड घालून निर्घृण हत्या, वाठोडा पोलिसांसमोर मोठे आव्हान!
– ओळख अद्याप गूढ सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध सुरू

The Exposer
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिम्बायोसिस कॉलेजच्या मागील जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी एका अज्ञात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर जड दगड घालून त्याची निर्घृण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला वेग देण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याने पांढऱ्या-राखाडी रंगाचा चेक्स फुल स्लीव्ह शर्ट परिधान केला होता. शर्टच्या कॉलरवर “SELECT” असे लिहिलेले असून, निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. जीन्सच्या मागील खिशावर “DENIM” असा इंग्रजीत उल्लेख आहे.

घटनास्थळावरील पुरावे आणि परिस्थितीवरून डोक्यावर जड दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय बळावला आहे. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस तपास सुरू आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी सांगितले की, मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या तरुणाबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने वाठोडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More