मोटारसायकल चोरट्याला पोलिसांचा दणका; मौदा पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई!

– सराईत आरोपी जेरबंद, तब्बल १२ दुचाकी जप्त

The Exposer
मौदा : सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या मोटारसायकली चोरीला जाण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी मोदा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत एका सराईत दुचाकी चोरट्याला जेरबंद केले. प्रवेश कन्हैया कंगाले (वय ३८, रा. पोलिस लाइन टाकळी, गिट्टीखदान, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मोदा शहरातील सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या मोटारसायकलींच्या वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारिन दुर्गे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत डी.बी. पथकाला आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले.

पोलिस पथकाने कसोशीने तपास करून संशयित प्रवेश कंगाले याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून मोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तसेच नागपूर शहर व भंडारा जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या एकूण १२ मोटारसायकली, अंदाजे ५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल, जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा मोटारसायकल चोरीतील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नागपूर शहर, नागपूर ग्रामीण तसेच भंडारा जिल्ह्यात मोटारसायकल चोरीसंदर्भात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

डी.बी. पथकाच्या कामगिरीचे कौतुक

ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारिन दुर्गे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

कारवाईत डी.बी. पथकातील सपोनि राहुल किते, पोलिस अंमलदार संदीप कडू, गणेश मुदमाळी, रुपेश महादुले आणि शिवाजी दिंडे यांनी सहभाग घेतला. एकाच कारवाईत १२ दुचाकी जप्त केल्याने मोदा पोलिसांच्या या कारवाईची परिसरात जोरदार चर्चा आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More